बॉसने बोल दिया होने का, तो होने का ! : डॉ. सुजय विखे पाटील
नगर : दर्शक । जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट करत डॉ. सुजय विखे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे. तसेच या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तोच अंतिम निर्णय होईल आणि तीच व्यक्ती जिल्हा बँकेत अध्यक्ष होईल. बाकी राहाता, कर्जत-जामखेडसह काँग्रेसच्या नेत्यासह कोणाला काय वाटते याला अर्थ नाही, असे रोखठोक उत्तर डॉ. विखे पाटील यांनी दिली. बॉसने सांगितलं म्हणजे गोष्ट संपली असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
रविवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षांतर्गत वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयालाच अंतिम मानणार असल्याचे सांगितले.पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. विखे म्हणाले, कुठलीही निवडणूक लागली की माझं नाव येतं, पण मला काही मिळत नाही. गेल्या सहा-सात महिन्यांपासून हेच चाललं आहे. विधानसभा लागली तर सुजय विखे आमदारकीला, विधान परिषद लागली तर सुजय विखे आमदारकीला आणि जिल्हा बँक लागली तरी माझंच नाव पुढे येतं. जिल्हा परिषदेत आरक्षण पडलं म्हणून ठीक आहे, नाहीतर तिथेही माझं नाव चालवलं असतं.
जिल्हा बँकेचे महत्त्व अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकर्यांच्या अस्मितेची आणि जिवाळ्याची संस्था आहे. सहकार क्षेत्रातील लोकांनी ही संस्था चालवणं योग्य राहील, जेणेकरून शेतकर्यांना न्याय मिळेल. आज नॅशनल बँका शेतकर्यांना सहज कर्ज देत नाहीत, पण अहिल्यानगर जिल्हा बँकेने शेतकर्यांना नेहमीच आधार दिला आहे. आपल्या पदाबाबत आणि पक्षाच्या आदेशाबाबत बोलताना ते ठामपणे म्हणाले, या खुर्चीवर तोच बसेल ज्याचे नाव देवेंद्र फडणवीस सांगतील. बाकी कोणाला काय वाटतं याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. राज्याला मुख्यमंत्री आहेत आणि ते आमचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी ज्याचे नाव निश्चित केले, ते काम होणार. बॉसने बोल दिया होने का, तो होने का! आमच्याकडे बाकी विचार करत बसत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
भोसाखिंड बोगदा होण्यासाठी प्रत्येक आमदारांचे श्रेय आहे. यासाठी दक्षिणेतील आमदारांनी आपआपल्या परीने योगदान दिलेले आहे. या बोगद्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार यांनी काय प्रयत्न केले याबाबत आपल्याकडे माहिती नाही. मात्र, ते म्हणत असतील तर त्यांच्याकडे काहीतरी पूरावा असलेच. हा विषय श्रेयवादाचा नाही. राज्यातील सर्व आमदार मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. नगर-करमाळा, नगर शहरातील उड्डाणपूलाचे काम मी मार्गी लावले. मात्र, या कामाच्या श्रेयाचे रुपांतर मतात होते की नाही, हे सांगत येणे कठीण असल्याचे विखे यावेळी म्हणाले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com