सायकल प्रेमी शरद डोंगरे पाटील, प्रा. बाळासाहेब गायकर व सत्यनारायण पुरोहित यांचा भक्तीमय प्रवास
अहिल्यानगर : गणपती बाप्पाच्या भक्तीने प्रेरित होऊन अहिल्यानगर येथील सायकलप्रेमी शरद डोंगरे, प्रा. बाळासाहेब गायकर आणि सत्यनारायण पुरोहित यांनी अहिल्यानगर ते अष्टविनायक अशी तब्बल ७०७ किलोमीटरची सायकल वारी पूर्ण केली. पाच दिवसांच्या या प्रवासात विविध घाटमार्गांचा सामना करीत तिघांनी अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेतले. या प्रवासात सुमारे ५२८६ मीटरचे एलिव्हेशन पार करण्यात आले.
या सायकल वारीमध्ये तिघांनी मोरगाव येथील मयुरेश्वर, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, थेऊर येथील चिंतामणी, लोणावळा व खोपोली मार्गे पाली येथील बल्लाळेश्वर, महड येथील वरदविनायक, माळशेज घाट व गणेशखिंड मार्गे लेण्याद्री येथील गिरिजात्मक, ओझर येथील विघ्नहर्ता आणि रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेतले.
प्रवासादरम्यान घाटरस्ते, चढ-उतार आणि पावसाचा सामना करीत तिघांनी सायकल वारी पूर्ण केली. प्रत्येक पेडलसोबत गणपती बाप्पाचे नामस्मरण करीत हा प्रवास करण्यात आला. त्यामुळे ही वारी केवळ सायकलचा प्रवास न राहता श्रद्धा, भक्ती, जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाची अनुभूती देणारी ठरली.
प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मित्रपरिवार तसेच सायकलप्रेमींची भेट झाली. अनेकांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत पुढील प्रवासासाठी स्फूर्ती दिली. या सर्वांच्या सदिच्छांमुळे वारीचा उत्साह अधिक वाढल्याचे तिघांनी सांगितले.
‘हा प्रवास जिद्दीचा होता’
याबाबत शरद डोंगरे यांनी सांगितले की, हा प्रवास जिद्दीचा होता. गणपती बाप्पाला भेटायचे होते आणि त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरण एक्सप्लोर करायचे होते. भक्ती, शक्ती आणि निसर्ग जोपासण्याचा संदेश देत सायकलचे महत्त्व सांगत हा प्रवास पूर्णत्वाकडे नेला. सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून आरोग्य, निसर्ग आणि आनंदाशी जोडणारे माध्यम आहे. त्यामुळे ‘देखना है तो कल, तो रोज चलाओ सायकल’ असा संदेश देत त्यांनी सायकलप्रेमाचा जागर केला.
गणपती बाप्पाच्या कृपेने ही ७०७ किलोमीटरची सायकल वारी सुखरूप पूर्ण झाली. अष्टविनायकांच्या चरणी सायकलने पोहोचण्याचा हा अनुभव अविस्मरणीय ठरला असून, भक्ती आणि सायकलप्रेमाचा अनोखा संगम या वारीत अनुभवता आल्याची भावना शरद डोंगरे, प्रा. बाळासाहेब गायकर आणि सत्यनारायण पुरोहित यांनी व्यक्त केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com