मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, सहा जखमी





नगर विळद घाट परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका व्यक्तीने वृद्धाश्रमातील इतर व्यक्तींवर लोखंडी हत्याराने हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी राजू तुकाराम घुले (वय ५४, रा. कुंभारी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू तुकाराम घुले (वय ५४, रा. कुंभारी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर ) हा विळद घाटातील मातोश्री वृद्धाश्रमात राहत होता. २६ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी राजू घुले याने आश्रमातील इतर वृद्ध मंडळी आपल्याला त्रास देत असल्याच्या गैरसमजातून किंवा मानसिक त्रासातून अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. 


त्याने जवळ असलेल्या लोखंडी हत्याराने आश्रमातील वृद्धांवर अचानक हल्ला चढवला. यात दत्तात्रय शंकर हारके (वय ८०, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर ) आणि मंगेलेश्वर बाबुराव हेणे ( रा. भिंगार, ता. व जि. अहिल्यानगर ) हे दोघे जागीच ठार झाले.


 तर संतोष भीमराव पिरंगळ (रा. नवी सांगवी, पुणे), गणेश छबू घोडके (रा. आंबेडकर बौद्धनगर, मनमाड, जि. नाशिक), बाळासाहेब अंबादास घाडगे (वय ७८, रा. गारखेडा, छत्रपती संभाजीनगर), निमराज दामोदर फिसके (वय ८०, रा. भिंगार), साहेबराव दगडू भवर (वय ८०, रा. निंबळक, ता. व जि. अहिल्यानगर ) आणि गोरक्ष हरिभाऊ फुंदे (वय ७४, रा. नारायण डोहो, अहिल्यानगर) हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व जखमी वृद्धांना तत्काळ पुढील उपचाराकरिता अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजू तुकाराम घुले यास तात्काळ ताब्यात घेतले असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती थोरात यांनी दिली.