व्हिजन लॅब हैदराबादचे शास्त्रज्ञ डॉ. अप्पाजी मांढरे यांचे शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मार्गदर्शन
शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे बु. येथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी फार्मसी क्षेत्रातील बदलते स्वरूप, औषधनिर्मिती उद्योगातील संधी, संशोधन व विकास, आधुनिक विश्लेषणात्मक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण तसेच उच्च शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
फार्मसी म्हणजे केवळ औषध तयार करण्यापुरते मर्यादित क्षेत्र नसून त्यामध्ये फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, क्लिनिकल रिसर्च, बायोटेक्नॉलॉजी आणि अकादमिक रिसर्च अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रश्न विचारा, प्रयोग करा आणि संशोधनाकडे वळा” तसेच विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते ज्ञान मर्यादित न ठेवता आपल्या आजूबाजूच्या समस्या ओळखून त्यावर वैज्ञानिक पद्धतीने उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मांढरे यांनी केले. संशोधनासाठी मोठ्या शहरातच असणे आवश्यक नाही. जिज्ञासा, सातत्य, प्रयोगशीलता आणि योग्य मार्गदर्शन या गोष्टी संशोधनासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती, स्थानिक वनस्पती, पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक आरोग्यविषयक समस्या यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून नाविन्यपूर्ण संशोधन करता येऊ शकते, याकडेही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील करिअर, संशोधना साठी आवश्यक कौशल्ये, उद्योगातील संधी, प्रयोगशाळेतील कामकाज आणि उच्च शिक्षण यासंदर्भात विविध प्रश्न संस्कृती वाळुंज, शेखर गिऱ्हे, क्षितिजा पवार, स्नेहल मंचरे, प्रांजली सासवडे या विद्यार्थ्यांनी विचारले. डॉ. मांढरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांना संशोधनाची दिशा समजावून सांगितली.
या संवादामुळे विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्राकडे केवळ पारंपरिक करिअर म्हणून न पाहता संशोधन व नवोपक्रमाचे व्यापक क्षेत्र म्हणून पाहण्याची प्रेरणा मिळाली.
महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन संस्था आणि तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.
या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी तसेच संशोधनाच्या व्यापक क्षेत्राची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप बाबासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com