अभियंता पुरस्कार | शेवगाव उपविभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा



वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून दोन्ही अभियंत्यांचे विशेष अभिनंदन


नगर : दर्शक । १६ सप्टेंबर २०२६।  सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तांत्रिक संवर्ग ( स्थापत्य ) विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय अभियंता प्रल्हाद अनंत पाठक व कनिष्ठ अभियंता शैलेश विष्णू साबळे यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२५ - २६ चा सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


२९ सप्टेंबरला मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा होणार

येत्या २९ सप्टेंबरला मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता विवेक माकुंदे व कार्यकारी अभियंता युवराज कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता पाठक व कनिष्ठ अभियंता साबळे यांनी शेवगाव उपविभागात केलेल्या विविध कामांचे मूल्यमापन समाजहिताच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 



भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा दि. १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभियंत्यांना वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 



पुरस्कारासाठी निवड झालेल्या अभियंत्यांचे आमदार मोनिका राजळे व सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी अभिनंदन केले आहे. 



यापूर्वी राज्य शासनातर्फे राबविण्यात आलेल्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत शेवगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावल्याने उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.