Nagar BJP | इंजि. रोहन भास्कर कुटे यांची भाजपा युवा मोर्चाच्या अहिल्यानगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती




 नगर : दर्शक । १६ सप्टेंबर २०२६। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अहिल्यानगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी इंजि. रोहन भास्कर कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुटे यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. ऋद्रेश भाऊसाहेब अंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.


      इंजि. रोहन भास्कर कुटे हे B.E. Civil शिक्षण घेतलेले असून, पक्षाच्या युवा संघटनेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील युवकांना भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेसोबत जोडणे, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे तसेच शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


      यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. ऋद्रेश अंबाडे यांनी कुटे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. युवा मोर्चाची भूमिका पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची असून, युवकांना संघटनेच्या माध्यमातून जोडण्याचे काम आगामी काळात अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाने दिलेली जबाबदारी ही जनतेशी जोडून घेण्याची संधी असून, कुटे यांनी युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


       “जिल्ह्यातील युवकांना सशक्त, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करणार आहे. पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना अधिक सक्षम, सशक्त आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून, त्यांच्या शिक्षण, रोजगार व कौशल्यविकासाशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न राहील,” असा निर्धार कुटे यांनी व्यक्त केला.


      आगामी काळात युवकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि अधिकाधिक युवकांना भाजपा युवा मोर्चाशी जोडणे, यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 



      या नियुक्तीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते पाटील आणि युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. ऋद्रेश अंबाडे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इंजि. रोहन कुटे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.