योगविद्याधामचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात; सीना योग महाविद्यालयाचे दिमाखात उद्घाटन
नगर : दर्शक । योगविद्याधामचा ४१ वा वर्धापन दिन तसेच योगविद्याधाम संचलित सीना योग महाविद्यालयाचे उद्घाटन रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाले. उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते सीना योग महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी योगविद्याधामचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे, संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा, जयंत वेसीकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक सुरेश पाटील, रूपेश झंवर यांच्यासह सुमारे शंभर योग शिक्षकांची उपस्थिती होती.
नगर शहरामध्ये गेल्या ४१ वर्षांपासून योगविद्याधामच्या माध्यमातून योगविद्येचा सातत्याने प्रचार व प्रसार केला जात आहे. योगाच्या माध्यमातून नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा मार्ग दाखविण्याबरोबरच योगशिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेने केले आहे. संस्थेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत योगशिक्षकांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
विशेष म्हणजे, दि. ३० ऑगस्ट हा योगमहर्षी स्वामी कुवलयानंद यांचा जन्मदिन आहे. स्वामी कुवलयानंद यांनी लोणावळा येथे सन १९२४ मध्ये कैवल्यधाम या योगसंस्थेची स्थापना करून योगविद्येला शास्त्रीय अधिष्ठान देण्याचे तसेच योगाचा देश-विदेशात प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत योगविद्याधामच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ योगशिक्षणाचा प्रसार सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने योगविद्याधामला एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे योगक्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अहिल्यानगरमध्येच एक महत्त्वाची शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असल्याने विविध क्षेत्रातील तरुणांना योगशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमहापौर धनंजय जाधव यांनी योगविद्याधामशी असलेले आपले कौटुंबिक नाते सांगितले. ते म्हणाले की, “माझे वडील कृष्णा जाधव हे त्यावेळच्या नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. तसेच ते योगविद्याधामचेही उपाध्यक्ष होते. त्यांनी याच संस्थेत योगाचे शिक्षण घेतले होते. सिद्धीबाग योग हॉलमध्ये ते अखेरपर्यंत योगाभ्यास करत होते. त्यामुळे या संस्थेच्या कार्याचा आणि योगविद्याधामचा मला विशेष अभिमान आहे.
योगविद्याधामने ४१ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत योगविद्येचा प्रचार-प्रसार करत अनेक योगशिक्षक घडविले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या, वाढता ताणतणाव आणि आरोग्यविषयक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत योगशास्त्राला शैक्षणिक अभ्यासक्रमाची जोड मिळणे ही नगरसाठी निश्चितच महत्त्वाची बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
उपमहापौर जाधव यांनी पुढे सांगितले की, कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी एम.ए. योगशास्त्र हा अभ्यासक्रम करू शकतो. त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त तरुण पदवीधरांनी या शैक्षणिक संधीचा लाभ घ्यावा आणि योगशास्त्राचे ज्ञान आत्मसात करून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे यांनी योगविद्याधामच्या ४१ वर्षांच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली. योगशिक्षण अधिक व्यापक करण्यासाठी तसेच योगशास्त्राला उच्च शिक्षणाची जोड देण्यासाठी सीना योग महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. योगविद्येच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा, जयंत वेसीकर, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक सुरेश पाटील, रूपेश झंवर यांच्यासह सुमारे शंभर योग शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी व योगप्रेमी उपस्थित होते. वर्धापन दिन आणि सीना योग महाविद्यालयाच्या उद्घाटनामुळे योगविद्याधामच्या कार्याला नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात झाली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com