PODAR SCHOOL NAGAR | पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ढोल-लेझीमच्या गजरात बाप्पाला निरोप

PODAR SCHOOL |






नगर : दर्शक ।  पोदार इंटरनॅशनल स्कूल, नगर येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी दररोज भक्तिभावाने श्री गणरायाची आरती केली. आरतीनंतर विद्यार्थ्यांनी प्रसादाचा आनंद घेतला. ढोल-लेझीमच्या गजरात, उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देताना विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत साश्रू भाव दिसून आले.




      गणेशोत्सवानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कथालेखन, डिजिटल ग्रीटिंग कार्ड तयार करणे, चेहरा रंगविणे, एकपात्री नाटक, पोस्टर तयार करणे, बियांची गणेशमूर्ती तयार करणे, ‘टाकाऊतून टिकाऊ’ वस्तू तयार करणे, वर्तमानपत्रापासून वेशभूषा निर्मिती तसेच गॅसविरहित पाककला अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. 



या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले सर्जनशील कौशल्य दाखविले. स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी शाळेतर्फे प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.




       याप्रसंगी बोलताना शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करावेत, त्यांना आपल्या पारंपरिक सणांचे महत्त्व समजावे, तसेच त्यांच्या अंगी विविध गुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने शाळेत गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विविध स्पर्धा व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, परंपरा आणि पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.




        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या उपप्राचार्या शगुफ्ता काझी, सीनियर ॲडमिन ऑफिसर आशुतोष नामदेव, ॲडमिन ऑफिसर नितीन गवांदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. गणरायाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला.