डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नावाखाली 'लकी ड्रॉ'द्वारे लाखो रुपयांची फसवणूक; मुख्य आयोजकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा!: कर्डिले
छावा क्रांतिवीर सेनेचा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना इशारा; राजकीय दबाव झुगारून फॉरेन्सिक ऑडिटची मागणी
नगर : दर्शक । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे पवित्र नाव वापरून कर्जत (अहिल्यानगर) येथे विनापरवाना बेकायदेशीर 'लकी ड्रॉ' चालवून, सर्वसामान्य नागरिकांना व महिलांना पैठणी साड्यांचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी आक्रमक मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे शहराध्यक्ष मनोज मारुती कर्डिले यांनी केली आहे. या गंभीर आर्थिक अपहाराबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि कर्जत पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.
छावा क्रांतिवीर सेनेने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, १४ एप्रिल २०२६ रोजीच्या जयंतोत्सवाचे निमित्त साधून मुख्य आयोजक सोमनाथ भैलुमे (युवा जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय पदाचा व प्रभावाचा गैरवापर करत प्रति कूपन २०० रुपये दराने बेकायदेशीर विक्री केली. यात इलेक्ट्रिक स्कूटर, एलसीडी टीव्ही, कुलर आणि महिलांसाठी 'पैठणी साड्या' यांसारखी आकर्षक बक्षिसे जाहीर करून हजारो गरीब व सर्वसामान्य महिलांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. या उपक्रमाला कोणतीही शासकीय परवानगी नसून शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडवण्यात आला आहे.
कूपन्सवरील अटींनुसार ३ मे २०२६ रोजी लकी ड्रॉ काढणे बंधनकारक होते. मात्र, मे ते सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप कोणताही ड्रॉ काढण्यात आला नाही अथवा बक्षिसांचे वाटप झाले नाही. जयंतोत्सवाच्या नावाखाली जमा केलेला संपूर्ण निधी आयोजकांनी परस्पर हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच २७ एप्रिल रोजी आयोजित 'नवयान महाजलसा' कार्यक्रमात निमंत्रित शाहिरांशी वाद घालून मारामारी करण्यात आली होती, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या प्रकरणात मुख्य आयोजक सोमनाथ भैलुमे, दत्ता भालेराव, विकास समुद्र आणि धनंजय भैलुमे यांच्यावर 'भारतीय न्याय संहिता' (BNS), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व लॉटरी नियमन कायद्यांतर्गत तात्काळ प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात यावा. तसेच आयोजकांच्या Google Pay, PhonePe व बँक खात्यांचे पोलिसांच्या फॉरेन्सिक टीममार्फत ऑडिट करण्यात यावे, अशी ठाम मागणी छावा क्रांतिवीर सेनेने केली आहे.
प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करून फसवणूक झालेल्या महिला व नागरिकांचे पैसे परत मिळवून द्यावेत, अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष मनोज मारुती कर्डिले यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com