Sant Nirankari Nagar | ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागम च्या सेवांचा मंगलमय शुभारंभ
Sant Nirankari Nagar | नगर : दर्शक । संत निरंकारी मिशनच्या वतीने सत्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात ७९व्या वार्षिक संत समागमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
आत्मिक जागृती आणि मानवतेच्या एकतेचा संदेश हृदयात घेऊन देश-विदेशातून लाखो श्रद्धाळू भक्त या समागमात सहभागी होणार असून त्या अनुषंगाने समागमाच्या सेवांचा शुभारंभ आज श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाने भारलेल्या वातावरणात झाला. निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन हस्ते सेवा स्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी मिशनच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य, केंद्रीय सेवादलाचे अधिकारी तसेच हजारो श्रद्धाळू भक्तांनी प्रेम आणि निष्ठेने सेवेत सहभाग घेतला. संत निरंकारी मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय राजकुमारी ‘मामीजी’ आणि संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून निरंकारी राजपिताजींचे हार्दिक स्वागत केले.
७९व्या संत समागमाच्या सेवांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित श्रद्धाळूंना संबोधित करताना निरंकारी राजपिताजींनी सत्गुरू माताजींचे प्रेम आणि आशीर्वाद संतांपर्यंत पोहोचवत सांगितले की, संत समागमाच्या सेवांचे हे विशाल स्वरूप असंख्य संतांच्या निःस्वार्थ सेवा, त्याग आणि समर्पणाचे फलित आहे. यातूनच आपल्या जीवनातही सेवा आणि परोपकाराची भावना जागृत करण्याची प्रेरणा मिळते.
मानवजन्म केवळ स्वतःसाठी नव्हे, तर इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी मिळाला आहे. सेवेतून ‘मी’ची भावना संपून ‘आपण’ची भावना निर्माण होते, तेव्हाच सेवेचा खरा अर्थ प्रकट होतो. सत्गुरूंचे ज्ञान हीच ती जागृती आहे,
जी आपली दृष्टी बदलून प्रत्येक मानवामध्ये निरंकाराचे स्वरूप पाहण्याची प्रेरणा देते. जेव्हा मानव मानवावर प्रेम करेल आणि त्याचा सन्मान करेल, तेव्हा ही धरती अधिक सुंदर बनेल. सत्गुरूंच्या चरणी हीच प्रार्थना आहे की, आपण केवळ मानव म्हणून नव्हे, तर आपल्या कर्मातून आणि वर्तनातूनही खऱ्या अर्थाने मानव बनू शकू.
यंदाच्या संत समागमाची ‘जागृती’ ही संकल्पना असून, ती मनुष्याला बाह्य जगापासून अंतर्मुख होऊन स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची आणि आपल्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून घेण्याची प्रेरणा देते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com