राजकीय व्यवस्थेबद्दल झपाट्याने होत चाललेला भ्रमनिरास आणि पायाभूत समस्यांबाबत सामान्य भारतीयांना प्रत्यक्ष येणारा अनुभव यातून एका चिंताजनक स्थितीकडे वाटचाल : डॉ. विवेक सावंत
नगर : दर्शक । दि. 8 ऑक्टोबर 2026: भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा तटस्थ आणि शास्त्रशुद्ध आढावा घेतल्यावर स्पष्ट होते की, स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात ,2047 मध्ये भारत बहुविध समस्यांच्या भीषण गर्तेत असेल. सर्वदूर फैलावणारी आर्थिक - सामाजिक विषमता आणि शोषण, राजकीय व्यवस्थेबद्दल झपाट्याने होत चाललेला भ्रमनिरास आणि पायाभूत समस्यांबाबत सामान्य भारतीयांना प्रत्यक्ष येणारा अनुभव यातून एका चिंताजनक स्थितीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे प्रेरक डॉ. विवेक सावंत यांनी येथे केले.सामाजिक संस्था आणि चळवळींसमोर सध्या अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असले तरी त्यांच्या प्रयत्नांमधूनच लोककेंद्रीत राजकीय आणि सामाजिक व्यवस्थांची निर्मिती होऊ शकते, असेही डॉ. सावंत म्हणाले.
स्नेहालय संस्थेतर्फे समर्पित सामाजिक कामांना गौरविण्यासाठी तसेच त्यांच्या पाठीशी आपले देणगीदार आणि कार्यकर्ते यांचे पाठबळ उभे करण्यासाठी बा, बापू, विनोबा हे पुरस्कार दिले जातात.
वर्ष 2026-27 यावर्षीचे हे पुरस्कार काल स्नेहालय संस्थेत डॉ. सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागेबाबा परिवाराचे संस्थापक कडूभाऊ काळे होते. स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, मुख्य पालक संजय गुगळे,डॉ. प्रीती भोम्बे, गीता कौर, संगणक तज्ञ अजित थडाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आदिवासी आणि ग्रामीण महिला आणि मुलींसाठी कस्तुरबा ट्रस्टच्या माध्यमातून गेली 65 वर्षे काम करणाऱ्या शेवंताबाई चव्हाण यांना बा पुरस्काराने गौरविण्यात आले.फासेपारधी मुलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रश्नचिन्ह संस्था चालविणाऱ्या मतीन भोसले यांना बापू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एड्स बाधित आणि अन्य अत्याचारित महिला - बालकांसाठी अंमळनेर (जि. जळगाव ) येथे आधार संस्थेमार्फत गेली अडीच दशके कार्यरत
डॉ.भारती पाटील यांना विनोबा सन्मान देण्यात आला.
50 हजार रुपये, सन्मानपत्र, पुस्तकांचा संच आणि संस्थाकार्याला उपयुक्त सामान यांचा पुरस्कारात समावेश असतो. याशिवाय संस्थेचे देणगीदार स्वतंत्रपणे या संस्थांना सहयोग देतात. संस्थेच्या सेवा संवर्धन कार्यशाळेच्या माध्यमातून अशा संस्थांचे सक्षमीकरण आणि शाश्वतीकरण स्नेहालय करते.
वर्ष 1995 पासून ही पुरस्कार योजना स्नेहालय राबवते..
बा पुरस्कार स्व. सीताबाई रावसाहेब मांढरे, बापू पुरस्कार माजी आमदार स्व. श्यामकांत दामोदर मोरे तर विनोबा पुरस्कार स्व. रावसाहेब पाटील मांढरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जातात.
स्नेहालय संस्थेतील आदर्श कर्मचारी पुरस्काराने बाल लैंगिक शोषणग्रस्त बालकांच्या संरक्षण, हक्क, रक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या कु. पूजा संभाजी दहातोंडे यांना गौरविण्यात आले. त्यांना संस्थेचा स्वर्गीय गोपालभाई गुजर आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्यात आला..
==============
कार्यकर्त्यांनी मूर्ती ऐवजी स्फूर्ती बनावे
डॉ. सावंत म्हणाले की,सामाजिक कार्यकर्त्यांनी ते कार्यरत असलेल्या संस्थेतील पूजनीय मूर्ती होऊन व्यक्तीमहात्म्य वाढवले तर संस्थेचा मूळ उद्देश असफल होतो. त्यातील लोकसहभाग बाधित होतो. आपल्या सेवा मंदिरातील ईश्वराची जागा लाभार्थ्यांनाच द्यायला हवी. येथे सेवारत कार्यकर्त्याची भूमिका ही विनम्र सेवकाची असावी .तरच असे कार्य - गांधी - विनोबा - कस्तुरबा - आंबेडकर - टिळक यांच्या पिढीने पाहिलेले सुबुद्ध आणि समृद्ध समाजाचे स्वप्न साकारू शकेल.
कस्तुरबा ट्रस्टच्या जागा आणि कार्य वाचवण्यासाठीचा संघर्ष शेवंताताई यांनी नमूद केला. आजही फासेपारधी समूहाला शासन आणि समाज व्यवस्थेचे बसणारे भीषण चटके मतीन भोसले यांनी सांगितले. एड्स बाधित महिला आणि मुलांच्या जीवनातील आव्हाने पेलताना स्नेहालय संस्थेची प्रेरणा कुठे आणि कशी कामी आली यावर डॉ.भारती पाटील विस्ताराने बोलल्या..
बाबा आमटे यांचे " थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा ", हे प्रेरणा गीत स्नेहालयाची विद्यार्थिनी साक्षी नरवडे हिने सादर केले .

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com