भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा संदेश; नगर समता परिषदेतर्फे सामाजिक उपक्रमांचा संकल्प
समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हाच खरा वाढदिवसाचा आनंद : प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर
नगर : दर्शक । महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथील भुजबळ फार्मवर भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवस साजरा करताना महागडे पुष्पहार, हारतुरे आणि पुष्पगुच्छांवर खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थी, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि वंचित घटकांना मदत करावी, हा सामाजिक संदेश यावेळी अधोरेखित करण्यात आला.
अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी समता परिषदेचे प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, अहिल्यानगर महानगराध्यक्ष ब्रिजेश ताठे, कार्याध्यक्ष अभिषेक चिपाडे, समता परिषदेचे नेते रामदास फुले, तालुकाध्यक्ष सोमनाथ धाडगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल गाडीलकर, पत्रकार वसंत रांधवन यांच्यासह नगर, पारनेर आणि जामखेड तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे म्हणाले की, छगन भुजबळ साहेबांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महागडे हारतुरे आणि पुष्पगुच्छ आणण्याऐवजी त्यासाठी खर्च होणारा पैसा समाजातील गरजू घटकांसाठी वापरण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, विधवा महिलांना आधार आणि दिव्यांग बांधवांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणे, हीच वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश त्यांनी दिला.
समता परिषदेचे प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर म्हणाले की, “वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजातील गरजूंच्या उपयोगी आणणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यास त्यांच्या शिक्षणाला हातभार लागतो, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धान्य किट दिल्याने त्यांच्या कुटुंबाला आधार मिळतो. छगन भुजबळ साहेबांनी दिलेला हा सामाजिक विचार केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविणे आवश्यक आहे.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. अहिल्यानगर जिल्ह्यात समता परिषदेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून, दुष्काळग्रस्तांना धान्य किट वाटप करण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा उल्लेख करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com