CPI Nagar |  मतदार यादीतील अनियमितता आणि 'SIR' प्रक्रियेविरोधात अहिल्यानगरमध्ये डाव्या आघाडीचे तीव्र निदर्शन; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

CPI Nagar | 'SIR' प्रक्रियेविरोधात अहिल्यानगरमध्ये डाव्या आघाडीचे तीव्र निदर्शन






 

CPI Nagar |  नगर : महाराष्ट्राच्या मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेविरोधात आज विविध डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांच्या (नगर - डावी आघाडी) वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या मा. राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.




या वेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M)जिल्हा समन्वयक कॉम्रेड प्रवीण सोनवणे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २.०७ कोटी नावे वगळण्यात आली आहेत. ही संख्या छत्तीसगड राज्याच्या एकूण मतदारांपेक्षाही अधिक आहे. मसुदा 'SIR' (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) प्रक्रियेचा हा मोठा धक्का असून, राज्यातील एकूण ९.७९ कोटी मतदारांपैकी तब्बल २१.१४% मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत."





त्यांनी पुढे सांगितले की, "टक्केवारी आणि एकूण संख्या अशा दोन्ही बाबतीत महाराष्ट्रात मतदारांची नावे वगळण्याचे प्रमाण उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त आहे. विशेषतः २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४०% किंवा त्याहून अधिक मतदारांची नावे काढण्यात आली आहेत. यातील बहुतांश मतदारसंघ हे मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या परिसरातील आहेत. या सर्वाला केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदार असून, त्यांनी अत्यंत पक्षपाती भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून निष्पक्ष व स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली.




भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) जिल्हा सहसचिव कॉम्रेड सुधीर टोकेकर यांनी सांगितले की, "आम्ही निवेदनाच्या माध्यमातून 'SIR' प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. जर निवडणूक आयोगाने ही मनमानी प्रक्रिया थांबवली नाही, तर डाव्या आघाडीच्या वतीने राज्यभरात व देशभरात तीव्र आंदोलने छेडली जातील."




राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनातील ५ प्रमुख मागण्या:

केंद्रीय निवडणूक आयोगाची (CEC) भूमिका पक्षपाती असल्याने मुख्य निवडणूक आयुक्तांना त्वरित हटवून निष्पक्ष व स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात यावी.

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया तात्काळ थांबवावी, कारण यामुळे सामान्य नागरिकांच्या मतदान हक्काला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

मतदार यादीमधील अनियमितता, नावे कमी करणे व चुकीची नावे समाविष्ट करणे हे तातडीने थांबवून पारदर्शक पद्धतीने पडताळणी करण्यात यावी.

निवडणूक प्रक्रियेबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांना विश्वासात घेऊन तातडीने निर्णय घेण्यात यावा.


दिल्ली पोलिसांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर केलेल्या लाठीमार व अत्याचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशी दडपशाहीची कृती तात्काळ थांबवावी व जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.



या आंदोलनात कॉ. प्रवीण सोनवणे (CPI-M), कॉ. सुधीर टोकेकर (CPI), कॉ. सतीश पवार (लाल बावटा), कॉ. राजू वैराळ, कॉ. विनायक गोरखे कॉ. किशोर खाडे कॉ. नितीन जगधने कॉ. ज्ञानदेव गायकवाड कॉ. राजेंद्र कचरे यांच्यासह विविध डाव्या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.