जागतिक पर्यटन दिनानिमित्त ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात उत्साहात हेरिटेज वॉक
अमूल्य ऐतिहासिक ठेव्याचे दर्शन घेत नागरिकांनी व्यक्त केली कृतज्ञता
नगर : दर्शक । जागतिक पर्यटन दिनानिमित्त अहिल्यानगर येथील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आलेला हेरिटेज वॉक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. इतिहास, संस्कृती, कला आणि वारसा यांची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, इतिहासप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“असेन मी... नसेन मी...
संग्रहालयात दिसेन मी...”
या भावनेतून उपस्थितांनी संग्रहालयातील ऐतिहासिक ठेवा पाहिला. संग्राहक पोपटकाका हळपावत यांनी संग्रहालयासाठी हस्तांतरित केलेल्या अमूल्य संग्रहाबद्दल उपस्थितांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. वैशिष्ट्यपूर्ण गारगोटी संग्रह, काष्ठशिल्पे, अडकित्ते, नाणी, विविध प्रकारची कुलूपे यांसह अनेक दुर्मीळ वस्तूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. निसर्गाची अद्भुतता आणि इतिहासाची समृद्ध परंपरा जपणाऱ्या या संग्रहातील पोपटकाकांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच शब्बीर शेख यांनीही स्वतःकडे असणाऱ्या अनेक दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा वस्तुसंग्रहालया साठी हस्तांतरित केल्याने त्यांनाही उपस्थितांनी धन्यवाद दिले.
संग्रहालयातील विविध तलवारी, ढाली, बंदुका, पगड्या, पोथ्या, हस्तलिखिते, चेन-लेस जर्मन बनावटीची सायकल, उत्खननात मिळालेल्या दगडी मूर्ती तसेच विविध गणेशमूर्तींचे दालन यांची उपस्थितांनी उत्सुकतेने पाहणी केली.
यावेळी सतिश गुगळे यांनी संग्रहालयासह आजूबाजूच्या ऐतिहासिक परिसराचा अभ्यासपूर्ण परिचय करून देत, तेथील इतिहास, वास्तू आणि सांस्कृतिक वारशाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली . व्यवस्थापक नारायण आव्हाड यांनीही संग्रहालयातील विशेष आणि दुर्मीळ वस्तूंची रंजक माहिती सांगत हेरिटेज वॉक अधिक प्रभावी केला.
विशेष आकर्षण ठरलेल्या ‘नगर दर्शन’ गॅलरीमुळे अहिल्यानगर शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली. तरुण वास्तुविशारद सुचित मुथा व मंदार खेले यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही गॅलरी शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रभावी दर्शन घडवते.
हेरिटेज वॉक यशस्वी करण्यासाठी पंकज मेहेर, श्याम असावा, प्रफुल्ल पवार सर, स्वयंम बास्कर व स्वराज गुगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव, व्यवस्थापक नारायण आव्हाड, हेरिटेज वॉक सदस्य करीमभाई रामपूरवाला, आबिद दुलेखान, पात्रे सर व ठाकूर परदेशी उपस्थित होते. तसेच प्रा.आनंद कटारिया, मनोज कदम यांच्यासह श्री शिवमुनीजी गुरुकुल शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित या हेरिटेज वॉकमुळे “आपला इतिहास जाणून घेऊया, आपला वारसा जपूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. सहभागी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com