स्नेहालयच्या पुरस्कारांसाठी शेवंताबाई चव्हाण, मतीन भोसले आणि आणि डॉ.भारती पाटील यांची निवड, 7 ऑक्टोबर रोजी वितरण
नगर : दर्शक । , दि. 3 ऑक्टोबर 2026 : स्नेहालय संस्थेतर्फे समर्पित सामाजिक कामांना गौरविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वार्षिक बा, बापू, विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.. वर्ष 2026-27 चे हे पुरस्कार कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंताबाई चव्हाण, असे पारधी मुलांसाठी कार्यरत मतीन भोसले आणि आणि महिला बालकांचे पुनर्वसन करणाऱ्या डॉ.भारती पाटील यांना दिले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जयाताई जोगदंड यांनी सांगितले.
येत्या बुधवार, दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुल, MIDC, अहिल्यानगर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा सर्वांसाठी खुला आहे.
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत प्रमुख संवादक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बा पुरस्कार (पू. कस्तुरबा गांधी) यासाठी बालिका व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मेळघाटसह अन्य महाराष्ट्राच्या भागात गेली 65 वर्षे कार्य करणाऱ्या कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंताताई चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
बापू पुरस्कार (महात्मा गांधी) यासाठी फासेपारधी आणि अन्य वंचित समूहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात कार्य करणारे मा. मतिनजी भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
विनोबा पुरस्कार (राष्ट्रसंत विनोबा भावे) यासाठी जळगाव जिल्ह्यात एचआयव्ही बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मा. डॉ. भारती पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
स्नेहालय संस्थेतील आदर्श कर्मचारी पुरस्कारासाठी बाल लैंगिक शोषणग्रस्त बालकांच्या संरक्षण, हक्क, रक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या कु. पूजा संभाजी दहातोंडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना संस्थेचा स्वर्गीय गोपाल वय गुजर आदर्श कर्मचारी पुरस्कार दिला जाणार आहे.
50 हजार रुपये, सन्मानपत्र, पुस्तकांचा संच असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
विविध तृणमूल सेवा कार्यांशी आपले देणगीदार ,कार्यकर्ते आणि तरुणाईला जोडण्यासाठी अशा पुरस्कार समारंभाचे आयोजन संस्थेतर्फे वर्ष 1995 पासून केले जाते.
बा पुरस्कार स्व. सीताबाई रावसाहेब मांढरे, बापू पुरस्कार माजी आमदार स्व. श्यामकांत दामोदर मोरे तर विनोबा पुरस्कार स्व. रावसाहेब पाटील मांढरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिले जातात.
या निमित्ताने समाजात पायाभूत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे दुर्मिळ अनुभव ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे..

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com