RPI Nagar | आज माझं खूष आहे मन... कारण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून करताहेत आंदोलन : मंत्री रामदास आठवले
RPI Nagar | नगर : दर्शक । आज माझं खूष आहे मन... कारण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून करताहेत आंदोलन... मात्र, महाराष्ट्रातील आमच्या सोबत आहे जन... पण आमच्याकडे अजिबात नाही धन.... अशी मिश्किल कविता करीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे बंधूंच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे सेनेद्वारे ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे त्याबाबत आज बोलताना मंत्री आठवले यांनी कविता केली व ठाकरेंच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारे भाष्य केले.नगरमधील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय साळवे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी व शोक सभेस उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे सह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आंदोलन करीत आहेत. याबाबत बोलताना मंत्री आठवले म्हणाले की, आम्हालाआनंद आहे ते आंदोलन करतात. बाळासाहेब ठाकरे असते तर कदाचित उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेले नसते. ते ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, कोक्रोज जनता पार्टी देखील राजीनाम्याची मागणी करत आहेत. कोक्रोज जनता पार्टीची स्थापनाच राजीनाम्यासाठी झालीय. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची त्यांची मागणी असली तरी माझ्या पक्षाची भूमिका आहे की ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊ नये. पण निवडणूक मतदार यादी पारदर्शक झालीच पाहिजे, असेही आठवले म्हणाले.
राज्यात सध्या दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेत राज्यात दुष्काळ जाहीर केलाय. केंद्र सरकारनेही आपल्या राज्याला मदत करावी यासाठी मी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेल. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी असे शिष्टमंडळ घेऊन केंद्राशी चर्चा करू, असे आठवले म्हणाले.
आरपीआय पक्ष जरी महाराष्ट्रातील असला तरी महाराष्ट्रात म्हणावा तसा पक्ष मोठा होत नाही अशी खंत व्यक्त करून आठवले म्हणाले, महाराष्ट्रात दलितांची टक्केवारी १३ ते १४ टक्के आहे. महाराष्ट्रात आमच्या समविचारी पक्षाने एकत्र आले पाहिजे यासाठी मी अनेकवेळा दोन पावले मागे येण्याची भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र असल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही. आजही प्रकाश आंबेडकर यांची तयारी असेल तर त्यांनी आरपीआयचे अध्यक्ष व्हावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे, अशी ऑफर आठवले यांनी दिली. दरम्यान,
समाज कल्याण खात्याचा निधी वळवू नये अशी माझी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. जर निधी वळवला तर तो आम्हाला परत दिला पाहिजे तसेच समाज कल्याणचा निधी वळवू नये यासाठी कायदा करावा अशी मागणी आठवले यांनी केली व यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही आवर्जून सांगितले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com