कल्पनेतलं घर, संस्कारांचं विश्व! इराबत्तीन परिवाराने साकारल्या पाच भातुकल्या

कल्पनेतलं घर, संस्कारांचं विश्व! इराबत्तीन परिवाराने साकारल्या पाच भातुकल्या





दातरंगे मळ्यातील चिमुकल्यांचा दिवाळीतील बोम्मरिल्लू (घरवंट) उपक्रम; समानतेचा दिला संदेश


नगर : बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा आणि संस्कृतीचे संस्कार रुजविणारा भातुकलीचा खेळ आजही आपले वेगळेपण जपत आहे. तेलुगू भाषेत भातुकलीला ‘बोम्मरिल्लू’ (घरवंट) असे म्हटले जाते. दिवाळीच्या निमित्ताने दातरंगे मळा, एकदंत कॉलनी येथील इराबत्तीन परिवाराने दरवर्षीची परंपरा जपत यंदाही पाच आकर्षक भातुकल्या मांडल्या आहेत.


       या भातुकल्या साकारण्यासाठी परिवारातील भाऊ, वडील आणि मुलगा यांनी विशेष पुढाकार घेतला. छोटी भांडी, चूल, सजावट आणि बाहुल्यांच्या माध्यमातून कल्पनेतील घराचे सुंदर विश्व उभे करण्यात आले. विशेष म्हणजे, भातुकली हा केवळ मुलींचाच खेळ नसून मुलांनीही त्यात सहभागी व्हावे, हा समानतेचा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला.


      स्वयंपाक करणे, घराची स्वच्छता राखणे, सजावट करणे अथवा बागकाम करणे या गोष्टी केवळ महिलांची जबाबदारी नसून घरातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही घरातील कामांची ओळख व्हावी, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती निर्माण व्हावी आणि जबाबदारीची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


        भातुकलीच्या खेळातून मुलांना नाती जपणे, सहकार्य, वाटून घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे अशी जीवनमूल्ये सहज शिकायला मिळतात. बदलत्या काळातही दिवाळीतील पारंपरिक खेळ आणि संस्कृती जपण्याचा इराबत्तीन परिवाराचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.