अमेरिकेत अहिल्यानगरच्या माही सिनारे यांचा क्रिकेटमध्ये डंका!
युनिव्हर्सिटी ऑफ टोलेडोच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान; दोन वेळा सामनावीर, एमव्हीपी क्रमवारीत द्वितीय स्थान
नगर दर्शक ।: परदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत अहिल्यानगरचे युवा क्रिकेटपटू माही सिनारे यांनी अमेरिकेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोलेडो येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत प्रभावी गोलंदाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी विविध वैयक्तिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेत माही सिनारे यांनी आपल्या गोलंदाजीतील अचूकता, चपळता आणि सामन्याची परिस्थिती ओळखून खेळण्याच्या कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांसमोर आव्हान निर्माण केले. त्यांच्या प्रभावी कामगिरीची दखल घेत त्यांना दोन सामन्यांमध्ये ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल त्यांना ‘स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज’ हा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वाधिक मौल्यवान खेळाडू अर्थात ‘एमव्हीपी’ क्रमवारीत त्यांनी द्वितीय स्थान पटकावले. एकाच स्पर्धेत तीन महत्त्वपूर्ण वैयक्तिक पुरस्कारांची कमाई करणे ही त्यांच्या सातत्यपूर्ण खेळाची पावती मानली जात आहे.
माही यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, क्रिकेटप्रती असलेल्या समर्पणाचे आणि जिद्दीचे फलित आहे. अमेरिकेसारख्या देशात क्रिकेट स्पर्धेत आपल्या गुणवत्तेची छाप पाडणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्यातही त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून अशीच उत्तुंग भरारी घेत अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com