Crime News Nagar | अहिल्यानगर MIDC परिसरात कारची काच फोडून एक लाखांची रोकड लंपास!
दुपारी भरदिवसा चोरट्यांचा डाव; पार्किंगमध्ये उभी असलेली कार फोडून रोकड चोरली, MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News Nagar | अहिल्यानगर | अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरात भरदिवसा कारची काच फोडून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही चोरी घडली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी योगेश संतोषराव कातोरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कातोरे हे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरीस असून, त्यांनी आपली कार एचपी एसके एंटरप्रायझेस परिसरातील ब्लॉक क्रमांक एफ-२६ येथे पार्किंगमध्ये उभी केली होती.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने संधी साधत कारच्या पुढील डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडली. त्यानंतर कारमध्ये ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड असलेले बंडल चोरट्याने लंपास केले. भरदिवसा आणि वर्दळीच्या औद्योगिक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केल्यास चोरट्यांचा माग काढण्यास मदत होऊ शकते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com