Urban Bank Ahmednagar: नगर अर्बन बँकेच्या सभासद, ठेवीदार व कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
Urban Bank Ahmednagar: अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर अर्बन बँकेतील अफरातफर व बोगस कर्ज प्रकरणासंबंधी दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करावी तसेच ठेवीदारांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी बँकेच्या सभासद, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना दिले. येत्या ८-१० दिवसात संबंधित आरोपींविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन खैरे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
अर्बन बँकेतील घोटाळ्यासंदर्भात दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी ठेवीदार, सभासद, कर्मचारी यांनी बँक बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी बँकेपासून ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात बँक बचाव समितीचे प्रमुख व मूळ फिर्यादी राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, मनोज गुंदेचा, अॅड. अच्युत पिंगळे, डी. एम. कुलकर्णी, सदाशिव देवगावकर, भैरवनाथ वाकळे, संजय झिंजे, एस. झेड. देशमुख, रमेश काळे, सोपान साळुंके यांच्यासह अनेक ठेवीदार, सभासद सहभागी झाले होते.
पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११३ वर्ष जुन्या वैभवशाली बँकेचा परवाना रिझर्व बँकेने ४ ऑक्टोबर रोजी रद्द केला आहे. यामुळे ठेवीदार, सभासद व कर्मचारी यांचे भवितव्य अंधःकारमय झालेले आहे. वास्तविक पहाता नगर अर्बन बँकेतील चेअरमन, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी हे विविध घोटाळे व अफरातफरी करत असल्याचे आपल्या कार्यालयाचे १७/०२/२०१९ रोजीच म्हणजे तब्बल साडेचार वर्षापूर्वी निदर्शनास आणून दिले होते.
दुर्दैवाने आपल्या कार्यालयाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे व्यथित होवून बँकेच्या सभासदांना उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करावी लागली. खंडपीठाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर आपल्या कार्यालयाने कोतवाली पोलिस स्टेशनला आदेश देवून १७ / २ / २०२२ रोजी गुन्हा क्रमांक १२१ / २०२२ नोंदवून घेतला. या दाखल गुन्ह्यातील सर्व कलमे अजामीनपात्र होती. परंतु पोलिस खात्याकडून कोणत्याही संचालकांना ताब्यात घेतले गेले नाही. ते संचालक पुन्हा पुन्हा भ्रष्ट कामे करतच राहिले व याची परिणीती म्हणून ४ ऑक्टोबर रोजी बँक बंद झाली. बँक बंद झाल्यामुळे गोरगरीब ठेवीदारांचे जवळपास ३२० कोटी रुपये अडकले आहेत. सभासदांचे भाग भांडवल व लाभांशाचे नुकसान झाले आहे. वार्षिक २००० कोटीचा व्यवसाय बंद झाल्यामुळे सभासदांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
गुन्हा क्रमांक १२१ / २०२२ सोबतच कोतवाली पोलिस स्टेशन येथे चिल्लर घोटाळा गुन्हा दाखल, डमी जामीनदार घोटाळा गुन्हा दाखल, तोफखाना पोलिस स्टेशन येथे बनावट मुल्यांकन घोटाळा गुन्हा दाखल, शेवगांव पोलिस स्टेशन येथे बनावट सोनेतारण घोटाळा गुन्हा दाखल, राहता पोलिस स्टेशनला बँकेतर्फे तक्रार अर्ज, श्रीगोंदा पोलिस स्टेशनला बँकेतर्फे तक्रार, तसेच महाराष्ट्र ठेव संरक्षण कायद्यांतर्गत अनेक अर्ज असे अनेक गंभीर गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद असून देखील त्यावर कुठलीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आज बँक बंद पडली आहे.
सर्व दाखल गुन्हे व तक्रार अर्जाचा विचार करता बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ यांना तातडीने अटक करण्यात यावी, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी. येत्या १५ दिवसांत ठोस व योग्य कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला
-compressed%20(1).jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com