Satkar |  विकास कांबळे यांनी मोहम्मद रफी यांचं शिल्प साकारून हाच अमरत्वाचा स्पर्श दिला आहे - डॉ. कमर सुरुर






नगर : दर्शक ।
नगर – हिंदी संगीत क्षेत्रातील अमर गायक मोहम्मद रफी यांचा हुबेहूब आणि आत्मस्पर्शी पुतळा साकारल्याबद्दल सुप्रसिद्ध शिल्पकार विकास कांबळे यांचा मखदूम सोसायटी, गाता रहे मेरा दिल ग्रुप आणि स्वरछंद ग्रुप यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. 



यावेळी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव व आंतरराष्ट्रीय शायरा डॉ कमर सुरुर,उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, स्वरछंद ग्रुपचे राजकुमार गुरनानी,हेमंत नरसाळे,विजय माळी, दिपा माळी, गाता रहे मेरा दिल ग्रुपचे एड. अमीन धाराणी,एड. गुलशन धाराणी, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान आदी मान्यवर उपस्थित होते.



विकास कांबळे यांनी केवळ एक चेहरा नाही, तर एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व शिल्पातून साकारले आहे. त्यांच्या कलेमध्ये केवळ आकार नव्हे तर भावना, अभिव्यक्ती आणि आत्मीयता यांचा सुंदर संगम दिसून येतो.शिल्पकला ही केवळ हातातील कौशल्य नाही, तर ती एक तपस्या आहे.


 ज्याच्यातून काळाच्या पुढे जाऊन एखाद्या व्यक्तीच्या आठवणींना, त्यांच्या भावभावनांना आणि त्यागाला अमरत्व दिलं जातं. विकास कांबळे यांनी मोहम्मद रफी यांचं शिल्प साकारून हाच अमरत्वाचा स्पर्श दिला आहे.असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय शायरा डॉ कमर सुरुर यांनी केले.


या सन्मानप्रसंगी बोलताना गाता रहे मेरा दिल ग्रुपचे एड. अमीन धाराणी म्हणाले, “विकास कांबळे यांचं हे शिल्प म्हणजे रफींच्या गायकीचं दृश्य रूप आहे. त्यांनी केवळ मूर्ती नाही तर भावना घडवल्या आहेत.”


या कार्यक्रमाला विविध कलाकार, संगीतप्रेमी आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. मोहम्मद रफी यांची गीते गात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आणि शिल्पकलेच्या या अद्वितीय कलाकृतीचे भरभरून कौतुक करण्यात आले.