वसंत टेकडी येथील साई मंदिराचा 12वा वर्धापन दिन साजरा 

Vasant Tekdi | भक्ती ही आचरणातून घडणारी जीवनपद्धती-हभप रायकर महाराज



नगर : दर्शक । 

वसंत टेकडी येथील संदेशनगरमधील द्वारकामाई श्री साई मंदिराचा 12वा वर्धापन दिन गुरुवारी उत्साह व भक्तिभावात साजरा झाला. पहाटे साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक व महापूजनाने प्रारंभ झाला. दुपारी होम-हवन आणि संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी घेतला.





या 12व्या वर्धापन निमित्ताने कीर्तन सेवेसाठी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. भागवताचार्य श्रीकृष्ण महाराज रायकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.आपल्या कीर्तनात रायकर महाराजांनी साईबाबांच्या जीवनातील श्रद्धा, सबुरी, सेवा आणि त्याग यांचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. “आपल्या मनगटात श्रमाचे बळ आणि ओठात नामस्मरण असेल तर कोणतीही अडचण ही वाटचाल रोखू शकत नाही,” असे सांगत त्यांनी भक्ती म्हणजे केवळ रितसर पूजा नव्हे, तर ती आचरणातून घडणारी जीवनपद्धती असल्याचे अधोरेखित केले.





तसेच, कीर्तनाच्या दुसऱ्या भागात त्यांनी समाजातील वाढत्या ताणतणाव, नैराश्य आणि स्पर्धात्मक जीवनात साईबाबांचे तत्त्वज्ञान किती आवश्यक आहे हे उदाहरणांसह स्पष्ट केले. “साईबाबा सांगतात की, जे घडते ते चांगल्यासाठीच, म्हणून प्रत्येक प्रसंगात संयम आणि श्रद्धा ठेवली पाहिजे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले. भाविकांनी टाळ्यांच्या गजरात या कीर्तनाचा मन:पूर्वक आनंद घेतला.या किर्तन सोहळ्यास हभप रवींद्र महाराज आव्हाड यांचे सहकार्य लाभले.




          कार्यक्रमात उपस्थित नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी द्वारकामाई साई मंदिर व साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.“फक्त धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आरोग्य तपासणी शिबिरे,भक्तीगीत स्पर्धा,हळदी-कुंकू समारंभ,राष्ट्रीय ध्वजाचे सन्मानाने स्वागत, अन्नदान तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही सातत्याने राबवत आहोत,”मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात असंख्य तरुणांनी रक्तदान केले.असे ते म्हणाले. “साईबाबांचे आशीर्वाद व सर्व कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळेच हे कार्य यशस्वी होत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


           या प्रसंगी बबलू सूर्यवंशी, पप्पू कापडे,सचिन ठोकळ, अमित गाढे,सचिन खोमणे, महेश टाक, दादा पाटोळे, निलेश पालवे,अमर मेट्टू, सुरज ठोकळ, आकाश त्र्यंबके, निखिल त्र्यंबके आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडले असून, श्रद्धाळूंच्या उपस्थितीने मंदिर परिसर पावन झाला होता.