Awards Nagar | स्त्री जन्माचे स्वागत समितीला ‘महाराष्ट्र रत्न 2025’ पुरस्काराने गौरव
नगर : दर्शक ।
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित ‘वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025’ हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या भव्य कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या वेळी गौरविण्यात आले.
या सोहळ्यात स्त्री जन्माचे स्वागत समितीला उत्कृष्ट व आदर्श सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजातील कन्या भ्रूणहत्या, स्त्री शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बालविवाह प्रतिबंध यांसारख्या विषयांवर समितीने केलेल्या जनजागृती उपक्रमांचे समाजभर कौतुक होत आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेऊन संस्थेला हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी समितीचे अध्यक्ष नरेश कोटा, विद्याताई एक्कलदेवी, सविता प्रकाश कोटा, ज्योती यमजाल, सविता नरेश कोटा, व रोहिणी कोडम उपस्थित होते. कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांमध्ये मा.श्री. अनिल (आण्णा) मोहिते पाटील, मा.श्री. ऋषिकेश भाऊसाहेब अंबाडे, कु. शिवानी बनकर (रिअॅलिटी स्टार) आणि श्री. सचिन तांडेळ (राष्ट्रीय क्रीडापटू व सिनेनिमाता) यांचा समावेश होता. मान्यवरांनी स्त्री जन्माचे स्वागत समितीच्या कार्याचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक श्री. तुषार अर्जुन बोरुडे यांनी समाजातील उपेक्षित, गरजू व सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. “चांगले काम करणाऱ्यांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांचा सन्मान होणे समाजासाठी प्रेरणादायी ठरते,” असे ते म्हणाले.
पुरस्काराचे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करताना संस्थेच्या वतीने समितीने केलेल्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. स्त्री जन्माचे स्वागत समितीनेही या सन्मानाबद्दल आभार मानत समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आश्वासन दिले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com