Sanvidhan Rally Nagar | संविधान जागर रॅली द्वारे सर्वधर्मसमभाव संदेश देत संविधानिक मुल्यांची जनजागृती
नगर : दर्शक ।
व्यक्ती किंवा राजकीय पक्ष काय सांगतात यापेक्षा जनतेला स्वतःच्या मनातील आवाज समजला, तरच संविधान खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. आज या विचाराची गरज अधिक जाणवते, धार्मिक द्वेषाला आळा घालण्यासाठी संविधान जागर आवश्यक असे मत एमजीएम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एच. एम. सोनकांबळे यांनी व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त मानवाधिकार अभियान, सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय तसेच विविध समविचारी संघटनांच्या वतीने शहरात संविधान जागर रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीनंतर सीएसआरडी येथे झालेल्या व्याख्यानात सोनकांबळे बोलत होते.कार्यक्रमाला सहायक आयुक्त प्रतीण कोरगंटीवार, स्वागताध्यक्ष प्रा. सुभाष वारे, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, मानवाधिकार अभियानचे अॅड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, लबडे, संजीव देठे आदी उपस्थित होते.
सोनकांबळे म्हणाले की, संविधान यशस्वी होण्यासाठी ते राबविणाऱ्यांची बांधिलकी महत्त्वाची आहे, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. धर्माचे राजकारणात आगमन झाले तर लोकशाही धोक्यात येईल, असा त्यांचा इशारा आज सत्य ठरत असल्याचे ते म्हणाले. राजकीय समता मिळाली असली तरी आर्थिक आणि सामाजिक समता अद्याप साध्य झालेली नाही. म्हणूनच समाजात जातीय आणि धार्मिक तणाव दिसतो. जनतेच्या मनातील आवाज आज दडपला जात असल्याने संविधान जागर अधिक महत्त्वाचा झाला आहे.
कोरगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यात अॅट्रॉसिटीचे गुन्हे चिंताजनक प्रमाणात वाढत आहेत. कायद्यात कठोर तरतुदी असल्या, तरी समाजातील पूर्वग्रह आणि भेदभावाची मानसिकता पूर्णपणे बदलली नाही, अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आहे, परंतु ती केवळ कायद्यापुरती न राहता मनातूनही नष्ट होणे गरजेचे आहे. मानवी सन्मान हा संविधानाचा केंद्रबिंदू असून, तो प्रत्यक्षात उतरला तरच समानतेचे समाजव्यवस्थेकडे वाटचाल होईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश पठारे यांनी आपल्या भाषणात संविधानातील मूलभूत मूल्यांवर सर्वांनी एकत्र येऊन चिंतन करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, संविधान पुस्तकात आहे म्हणून चालते, असे नसून ते दैनंदिन जीवनात व आचरणात आले पाहिजे. लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये केवळ शब्द नसून समाज घडवण्याचे आधारस्तंभ आहेत. आजच्या विभाजनकारी वातावरणात ही मूल्ये अधिक दृढ करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक करताना प्रा. सुभाष वारे म्हणाले की, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन हे तीनही दिवस केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता देशभर सणासारखे साजरे व्हायला हवेत. कारण हे तीन दिवस आपल्याला मूल्याधिष्ठित राष्ट्राची जाण करून देतात. प्रत्येक भारतीयाचा सहभाग या कार्यक्रमांमध्ये असणे आवश्यक आहे. देशात समतेची भावना दृढ करण्यासाठी युवकांनी संविधानाचे अध्ययन करणे, त्यातील तरतुदी समजून घेणे आणि समाजात त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. संविधानाचा आत्मा जनतेत पोहोचला तरच लोकशाही अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संध्या मेढे यांनी संविधानाचे वाचन केले.जन गण मन राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सॅम्युअल वाघमारे यांनी केले. आभार अशोक सब्बन यांनी मानले. सभागृहात विद्यार्थी रियांश पासकंटी यांनी डॉ. आंबेडकरांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून संविधान रॅलीला प्रारंभ झाला.
कोरगंटीवार यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात झाली. धर्मगुरू रेव्ह. जे.आर.वाघमारे, हभप अजय महाराज बारस्कर, अमित महाराज, युनूस तांबटकर, डॉ. प्रशांत शिंदे,आबीद दुलेखान,डॉ.सुरेश मुगुटमल,प्रा.डॉ. महेबुब सय्यद, डॉ.जेमोन वर्गीस, डॉ.विजय संसारे, डॉ. प्रदीप जारे, विकास कांबळे, संजय झिंजे, कॉ. भैरवनाथ वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वधर्मसमभाव हा संदेश यामधून देण्यात आला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com