Pune Crime News | येरवड्यातील सराईत गुन्हेगार अजय कसबे जेरबंद
पुणे : येरवडा परिसरात दहशत निर्माण करणारा आणि मोक्का कारवाईनंतर फरार असलेला सराईत गुन्हेगार अजय युवराज कसबे (वय २४) याला येरवडा पोलिसांनी थरारक पाठलाग करून अखेर अटक केली आहे. अजय कसबे हा भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा येथील रहिवासी आहे.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गाड्यांची तोडफोड, मारहाण आणि दहशत माजवण्याच्या प्रकरणात प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला येरवडा कारागृहातून सुटल्यावर गुंड्या कसबेची त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅलीही चर्चेत राहिली होती. त्या प्रकरणात गुंड्यासह अजय कसबे यालाही अटक झाली होती, तसेच पोलिसांनी या सर्वांची धिंड काढून परिसरात फिरवले होते.
याच दरम्यान बाहेर आल्यानंतर अजय कसबे, अंश्या नितीन पुंढे, ममड्या उर्फ सुरज खुडे आणि कुणाल चांदणे यांनी मिळून आदित्य श्याम गाडे (वय २२) यांच्यावर 27 जून 2025 रोजी रात्री गुंजन चौकात लोखंडी हत्याराने हल्ला केला होता. या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली असून, पुढे या प्रकरणातही मोक्का लागू करण्यात आला. मात्र त्यानंतर अजय कसबे फरार झाला होता.
दरम्यान, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी कसबेचा वापरता मोबाईल क्रमांक शोधून काढला. तो सतत मोबाईल नंबर व वास्तव्य बदलत असल्याने त्याचा शोध घेणे अवघड झाले होते. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कसबे हा पुणे–सोलापूर रोडमार्गे मूळ गावी पळून जाणार आहे.
ही माहिती मिळताच पोलिसांनी जाळे टाकले. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने तो गावी जाणार असल्याचे समजताच, पोलिसांनी बसचा पाठलाग केला आणि योग्य क्षणी कारवाई करत अजय कसबेला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या अजय कसबेला पुढील प्रक्रियेसाठी सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या संपूर्ण कारवाईत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, तसेच पोलीस कर्मचारी शिंदे, कोकणे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड, निलख यांनी विशेष भूमिका बजावली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com