Pune News | विमाननगर, कल्याणीनगर नगर रोड परिसरात यांत्रिकी पद्धतीने घरोघरी जावून कचरा गोळा करणार
Pune News | पुणे : महापालिकेच्या परिमंडळ १ अर्थात विमाननगर, नगर रोड परिसरात घरोघरी जावून यांत्रिक पद्धतीने कचरा गोळा करण्यासाठी भाडेतत्वावर १८४ हून अधिक वाहने पाच वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतली जाणार आहेत. पाच वर्षांसाठी या भाड्यापोटी १३४ कोटी ४० लाख रुपयांंच्या एस्टीमेटला सोमवारी झालेल्या एस्टीमेट कमिटीमध्ये मान्यता देण्यात आली.
महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी पुढचे पाउल म्हणून विमान नगर परिसरात घरोघरी जावून यांत्रिक पद्धतनीने कचरा गोळा करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला. एक महिन्यामध्ये या परिसरातील कचरा वेचकांकडून गोळा करण्यात येणारा कचरा एका ठिकाणी आणण्याचे फिडर पॉईंट बंद झाले.
यासाठी घरोघरी जाणार्या वाहनांच्या वेळा आणि तेथून हा कचरा रॅम्प व प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत पोहोचविण्याचे वेळापत्रकही महापालिकेने तयार केले. विमाननगर परिसरात या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद लाभला असून सार्वजनिक ठिकाणी पडणार्या कचर्याचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे महापालिकेने हा प्रकल्प संपुर्ण शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
याचाच पहिला टप्पा म्हणून परिमंडळ एक अंतर्गत येणारे येरवडा, धानोरी, लोहगाव, कल्याणीनगर, खराडी सारख्या सर्व भागात घरोघरी जावून वाहनांद्वारे कचरा गोळा करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे १८४ छोट्या मोठ्या वाहनांची गरज आहे.
ही वाहने पाच वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्याचे १३४ कोटी ४० लाख रुपयांचे एस्टीमेट घनकचरा विभागाकडून तयार करण्यात आले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एस्टीमेट कमिटीची बैठक झाली. या बैठकीत या एस्टीमेटला मान्यता देण्यात आली असून लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, शहरातून ओला व सुका कचरा वेळेत उचलण्यासाठी इंदूरच्या धर्तीवर यांत्रिक पद्धतीने घरोघरी जावून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वाहनांची गरज भासणार आहे.
लवकरच भाडेतत्वावर ही वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. घरोघरी जावून कचरा गोळा करणार्या या वाहनांमध्ये ओला, सुका, तसेच प्रक्रिया न होणारा काचा, लाकडी साहित्य गोळा करण्याची सुविधा असेल तसेच सॅनेटरी नॅपकिन्सही स्वतंत्रपणे गोळा करण्याची सुविधा राहील.
नागरिकांनी ओल्या व सुक्या कचर्यासाठी स्वतंत्र डबे ठेवणे अपेक्षित आहे. त्यामुळे कचर्याचे विलगीकरण व त्यावरील प्रक्रिया सुलभ होईल. यासाठी जनजागृती देखिल करण्यात येणार आहे, असे राम यांनी सांगितले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com