३२ तासांच्या थरारानंतर मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे मोकळा
मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील तब्बल ३२ तास ठप्प झालेली वाहतूक अखेर मध्यरात्री २ वाजता पूर्ववत करण्यात आली. आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने तातडीने वाहतूक थांबवली. दुर्घटनाग्रस्त टँकरमधील गॅस अत्यंत दक्षतेने दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आला आणि एक्स्प्रेसवेवरील मार्ग हळूहळू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मार्ग खुला, पण अडथळे कायम
मुख्य अडथळा दूर झाल्यानंतरही प्रवाशांना पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही. मळवलीजवळ एक ट्रक बंद पडल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तसेच सलग प्रवासामुळे थकलेले अनेक अवजड वाहनांचे चालक कामशेत परिसरात रस्त्याच्या कडेला झोपी गेल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
महामार्ग पोलीस सध्या झोपलेल्या चालकांना जागे करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आडोशी बोगद्याजवळ परिस्थिती नियंत्रणात असली तरी काही ठिकाणी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
या गंभीर वाहतूककोंडीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावी यंत्रणा उभी करण्यासाठी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश त्यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. चौकशी अहवालासोबत आवश्यक शिफारसी सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com