ब्राह्मण सेवा संघ, केडगावकडून राज्यभरात विक्रमी २२ सामुदायिक व्रतबंध सोहळे संपन्न







नगर : दर्शक । दि ६ मे २०२६ ।  


ब्राह्मण समाजातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा व्रतबंध (उपनयन संस्कार/मुंज) हा संस्कार ब्राह्मण सेवा संघ, केडगाव यांच्या वतीने यंदा संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी पातळीवर पार पडला. दि. ३ मे २०२६ रोजी एकाच दिवशी सुमारे २२ सामुदायिक व्रतबंध सोहळ्यांचे आयोजन करून संघटनेने एक उल्लेखनीय विक्रम नोंदविला आहे.



         व्रतबंध हा मुलाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. शिक्षणासाठी गुरुगृही पाठवण्यापूर्वी हा संस्कार करण्याची परंपरा असून त्याला धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. आधुनिक काळातील धावपळ, वेळेची कमतरता आणि वाढते आर्थिक ओझे लक्षात घेता, सामुदायिक पद्धतीने हा संस्कार करण्याची संकल्पना अधिक उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.




           ब्राह्मण सेवा संघ, केडगावतर्फे गेल्या तब्बल २८ वर्षांपासून सातत्याने सामुदायिक व्रतबंध सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ज्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे अशा कुटुंबांतील मुलांचे व्रतबंध मोफत करून समाजाभिमुख कार्याचा आदर्श संघटनेने जपला आहे. याबाबत माहिती देताना संघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार पोळ यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाला धार्मिक संस्काराची संधी मिळावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”




           या भव्य सोहळ्याचे पौरहित्य वेदमूर्ती पंढरपूरकर गुरुजी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. सोहळ्याचा एक विशेष आकर्षण म्हणजे सर्व बटूंची पारंपरिक वेशभूषेत वाजतगाजत काढण्यात आलेली मिरवणूक, ज्यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.



         याच कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या ऋग्वेद कंठस्थ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडून सन्मानित झालेल्या श्री. वेदांत कुलकर्णी (पंढरपूरकर) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.ते गेल्या चौदा वर्षांपासून आबासाहेब पटवर्धन वेदशास्र विदयालय,पुणे येथे वेदाचार्यश्रीपादशास्त्री धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापन करत आहेत.



         विशेष म्हणजे पुरस्कारार्थी श्री वेदांत हे वेदमूर्ती श्री. पंढरपूरकर गुरुजी यांचे चिरंजीव आहेत, ही बाब उपस्थितांसाठी अभिमानास्पद ठरली.



कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यामध्ये मा. आमदार संग्रामभैय्या जगताप, श्री. सचिनजी जगताप, नगरसेवक श्री. अमोल येवले, नगरसेवक श्री. विजय पठारे, सौ. प्रियाताई जानवे, श्री. विवेक नाईक आणि श्री. योगेश दाणी यांचा समावेश होता.


         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी, ज्ञानेश देशपांडे, प्रशांत देशपांडे, आनंद ठिपसे, दिलीप इनामदार, पंकज जहागीरदार, नितीन क्षीरसागर, धनंजय जामगांवकर, मिलिंद वडाळकर, डॉ. सुधीर कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, नंदकुमार कुलकर्णी, राजेश कळसे, अजित कुलकर्णी, किरण कुलकर्णी, राहुल पांडव, गिरीश क्षीरसागर, योगी क्षीरसागर, किरण खुर्जेकर तसेच तेजस्विनी महिला ग्रुप यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.



एकूणच, ब्राह्मण सेवा संघ, केडगाव यांच्या या उपक्रमामुळे पारंपरिक संस्कार जपत समाजातील सर्व स्तरांपर्यंत धार्मिक विधी पोहोचवण्याचे कार्य प्रभावीपणे घडून आले असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.