जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, बालकल्याण उपक्रमांचे कौतुक

डिस्ट्रिक्ट प्रोबेशन असोसिएशनची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न





डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन संचलित मुला-मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह संस्थेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झारेकर गल्ली येथील संस्थेच्या कार्यालयात जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी वर्षातील विविध योजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





           सभेच्या प्रारंभी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचा वार्षिक अहवाल, आर्थिक वर्षातील हिशोब पत्रके, अंदाजपत्रक, हिशोब तपासणीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती, रिक्त पदांच्या भरतीसंदर्भातील प्रस्ताव तसेच संस्थेच्या प्रशासकीय आणि विकासात्मक कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी तसेच मुला-मुलींना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सूचना आणि प्रस्तावांवर एकमताने निर्णय घेण्यात आले.





          यावेळी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपाध्यक्ष अच्युतराव चौधरी, सचिव अॅड. गोविंदराव मिरीकर, अॅड. जयवंत भापकर, डॉ. शकील फातेमा शेख, खजिनदार अॅड. विश्वासराव आठरे पाटील, कार्यकारी सदस्य मीरा कुलकर्णी, अनुराधा आठरे, विनिता गुणे, कंचन रच्चा, प्राची देशमुख, डॉ. अमित बडवे, संस्थेच्या अधीक्षिका पौर्णिमा माने, सीए रोहित बोरा, जिमबा अधिकारी संजय कदम, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.




         सभेदरम्यान जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. उपस्थितांनीही पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.



        यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संस्थेतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक सहभाग यांना विशेष महत्त्व देण्याची गरज अधोरेखित केली. संस्थेतील मुला-मुलींना सुरक्षित, सुसंस्कृत आणि प्रगतीशील वातावरण मिळावे यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी मुला-मुलींसाठी सेवा, सुविधा, शिक्षण, आरोग्यविषयक उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.




संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेचा समारोप अत्यंत खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात झाला.