नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत ; शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना करण्याचा निर्धार
नगर : दर्शक ।
वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नाथ विद्या मंदिर व डॉ.पाऊलबुधे माध्यमिक शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला “प्रवेशोत्सव” मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टाळ्यांचा कडकडाट व मंगलमय स्वागतगीतांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांचा उत्साह लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत शिक्षणाच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रवेशोत्सवानिमित्त संपूर्ण शाळा आकर्षक फुलांची सजावट, रंगीबेरंगी फलक व स्वागत कमानींनी सजविण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक उपक्रम, खेळ, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच प्रेरणादायी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, सहसरचिटणीस रामकिसन देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री.बुचकुल यांनी सांगितले की,“शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे शिस्त, संस्कार, प्रामाणिकपणा आणि परिश्रम या मूल्यांची जोपासना करत ज्ञानार्जन करणे आवश्यक आहे. श्री.देशमुख म्हणाले की शाळेतील प्रत्येक दिवस हा नवीन शिकण्याची संधी म्हणून स्वीकारल्यास यश नक्की मिळते.”
श्री.भोईटे यांनी सांगितले की, “श्री नाथ विद्या मंदिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे व पालकांनीही मुलांच्या प्रगतीसाठी शाळेला सहकार्य करावे.”असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माध्यमिकच्या प्राचार्य विजया नवले, श्री नाथ मंदिर च्या मुख्याध्यापिका संगीता सब्बन यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत घर आणि शाळा यांच्यातील सुसंवादामुळे विद्यार्थ्यांचा विकास अधिक प्रभावीपणे होतो.असे मत व्यक्त करण्यात आले. उपस्थित पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रवेशोत्सवामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नवीन विद्यार्थ्यांनीही शाळेच्या वातावरणाशी सहजपणे जुळवून घेत शिक्षणाच्या नव्या पर्वाला उत्साहाने सुरुवात केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे विशेष सहकार्य लाभले.
शेवटी सर्व नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. “तमसो मा ज्योतिर्गमय” या ब्रीदवाक्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रकाश देण्याचा संकल्प व्यक्त करत प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com