ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर योग संगम विविध महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी एकत्र येत केली योगसाधना

 
ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर एनसीसी कॅडेट्सनी केली योगसाधना





नगर : दर्शक । 



जागतिक योग दिनाचे औचित्य साधून १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नगरच्या वतीने ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विस्तीर्ण प्रांगणात योग संगम कार्यक्रमाचे उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजन करण्यात आले होते.



 ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या भुईकोट किल्ल्यावर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात शेकडो एनसीसी कॅडेट्सनी एकत्र येत योगसाधना केली आणि आरोग्यसंपन्न जीवनाचा संकल्प सोडला. या विशेष योग महोत्सवासाठी १७ महाराष्ट्र बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल निकेत सिंग नेगी प्रामुख्याने उपस्थित होते. 



कर्नल नेगी यांनी शारीरिक आणि मानसिक सक्षमतेसाठी योगाचे महत्त्व पटवून दिले. योग शिक्षिका साजरी परदेशी आणि पूनम वाछात्नी यांनी कॅडेट्स व शिक्षकांना योग प्रशिक्षण दिले. त्यांनी विविध योगासने, मुद्रा आणि प्राणायामाचे प्रकार अत्यंत सोप्या पद्धतीने करवून घेतले. प्रत्येक आसनाचे शरीरावर होणारे परिणाम आणि त्याचे वैज्ञानिक महत्त्व त्यांनी प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. 



या कार्यक्रमात अहमदनगर कॉलेज, अहिल्यानगर, न्यू आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अहिल्यानगर, दादा चौधरी माध्यमिक शाळा, रेसिडेन्शियल हायस्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, भाऊसाहेब फिरोदिया शाळा, या सर्व शाळा व महाविद्यालयांमधील छात्र सैनिकांनी (कॅडेट्स) अत्यंत शिस्तीत आणि उत्स्फूर्तपणे सर्व आसने पूर्ण केली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बटालियनच्या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालये आणि शाळांचे सहयोगी एनसीसी अधिकारी व लष्करी कर्मचारी उपस्थित होते. 



यामध्ये प्रामुख्याने लेफ्टनंट डॉ. एम. एस. जाधव, लेफ्टनंट भरत होळकर, सीटीओ नेटके, थर्ड ऑफिसर गणेश भापकर, चोभे, विकास साबळे, सुभेदार मेजर राजेशराव मोरे आणि इतर स्टाफ यांनी परिश्रम घेतले. लेफ्टनंट भरत होळकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.