स्वावलंबनाचा मार्ग खुला; पाच तालुक्यांतील गरजू कुटुंबांना मदतीचा हात
नगर : दर्शक ।
रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल आणि चंद्रकांतजी, ज्योत्स्ना, आशिष व सौ. श्रद्धा मुथा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत पाच तालुक्यांतील विविध गावांमधील सर्वसामान्य परिस्थितीतील, कुटुंबाला आधार देणाऱ्या महिलांना ११ आटा चक्क्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थी महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध झाला असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची मदत मिळणार आहे.
या कार्यक्रमाला रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल रो. सुधीरजी लातुरे, सौ. संगीता लातुरे, क्लब अध्यक्ष सुनील कटारिया, सचिव अमर गुरप, माजी प्रांतपाल (PDG) शिरीष रायते, नरेंद्र चोरडिया, मधुबाला चोरडिया, राजेश परदेशी, ईश्वर बोरा, मनीष बोरा, गिरीश मुळे, मीनल बोरा, सुजाता कटारिया, वैशाली रायते, विजूभाऊ जुंद्रे, राजीवभाई गुजर, उमेश रेखे, सुनील मुथा, संजय मुनोत, सतीश कटारिया, सार्थक कटारिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात अध्यक्ष सुनील कटारिया यांनी रोटरी सेंट्रलने चालू वर्षात राबविलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक प्रकल्पांची माहिती दिली. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी तसेच गरजू कुटुंबांना सक्षम करण्यासाठी क्लब सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी सेंट्रलने वर्षभरात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रांतपाल रो. सुधीरजी लातुरे म्हणाले की, समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था देणगीच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करतात. त्या देणग्यांचा योग्य व पारदर्शक विनियोग करून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे महत्त्वाचे कार्य रोटरीसारख्या संस्था करतात. गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने सेवा देत असून गरजूंपर्यंत मदतीचा लाभ पोहोचवित आहे.
ते पुढे म्हणाले की, समाजात आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सर्वसामान्य अशा दोन्ही स्तरांतील लोक राहतात. या दोघांमधील दरी कमी करण्यासाठी सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या पूर्वीच्या मूलभूत गरजांमध्ये आता काळानुरूप अनेक नव्या गरजांची भर पडली आहे. प्रत्येक गरज पूर्ण करणे शासनाला एकट्याला शक्य नसते. अशा वेळी रोटरीसारख्या सामाजिक संस्था समाजातील दानशूर व्यक्ती आणि गरजू घटक यांच्यामधील विश्वासाचा दुवा बनून कार्य करतात.
लाभार्थी महिलांना आटा चक्कीचे वितरण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत रोटरी सेंट्रलच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
रोटरी सेंट्रल अहिल्यानगरने शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून समाजात सकारात्मक कार्याची छाप निर्माण केली आहे. रोटरीची प्रतिमा उंचावण्यासाठी अध्यक्ष सुनील कटारिया यांनी वर्षभर सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीम समाजोपयोगी कार्यात सक्रियपणे सहभागी होत आहे. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि गरजूंच्या उन्नतीसाठी राबविण्यात आलेला हा आटा चक्की वितरणाचा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com