श्री समर्थ विद्यामंदिरात दहावी-बारावीच्या गुणवंतांचा भव्य सत्कार
नगर : दर्शक ।
श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला, सावेडी येथे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे चेअरमन मा. ॲड. किशोरजी देशपांडे होते.
कार्यक्रमाची सुरुवात समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ. वसुधा जोशी यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक व्यक्त करत प्रशालेच्या उज्ज्वल निकालाची माहिती दिली. यावर्षी प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून बारावीचा निकाल ९८ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी २३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल १२२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत यश संपादन करून प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.
यावेळी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. दीपक ओहोळ, सेक्रेटरी व प्राथमिक विभागाचे चेअरमन मा. सुरेश क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य सौ. संध्या कुलकर्णी, श्री सुनील जोशी, सांगळे गल्ली माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील कानडे तसेच पर्यवेक्षक एल. एम. कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गणित प्राविण्य, एन.एम.एम.एस., सी. व्ही. रामन आदी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा भेटवस्तू व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनी अनन्या कदम व सई जोशी यांनी मनोगत व्यक्त करून प्रशालेतील शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पालक प्रतिनिधी म्हणून राणी दळवी यांनीही विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात मा. ॲड. किशोरजी देशपांडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शिक्षकांच्या समर्पित कार्याचा गौरव केला. “विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचा मोठा सहभाग असतो. दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. प्रशालेत होत असलेला हा सत्कार विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा असून त्यांच्या भविष्यातील उच्च शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बोठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. शिल्पा कुलकर्णी यांनी केले. अध्यक्षांचा परिचय सौ. कोळंबे यांनी करून दिला. शिक्षक सत्कार वाचन सौ. शास्त्री यांनी तर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे श्री. राशीनकर यांनी सादर केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com