डॉ.पाऊलबुद्धे तंत्रनिकेतनात जागतिक योग दिन उत्साहात
नगर : दर्शक । सोलापूर रोडवरील नारायणडोहो येथील डॉ.ना. ज.पाऊलबुद्धे तंत्रनिकेतनात २१ जून जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.ना. ज.पाऊलबुद्धे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती ज्ञानदा पवार यांनी योगाचे महत्त्व, त्यामागील शास्त्रीय आधार तसेच दैनंदिन जीवनात योगाचे असलेले स्थान याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यास केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, तणाव कमी होतो आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक आजारांपासून संरक्षण मिळते, असे त्यांनी सांगितले.
यानंतर आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेशित झालेल्या विद्यार्थिनी सेजल चिकटे व प्रतीक्षा पवार यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेत विविध आसनांचे फायदे समजावून सांगितले. उपस्थितांनीही उत्साहाने योगासने करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, उपप्राचार्य राजेंद्र देशपांडे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी जीवनासाठी नियमित योग करण्याचा संकल्प केला.
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून योगाचे महत्त्व अधोरेखित झाले असून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com