भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत; मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
नगर : दर्शक ।
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याने विद्यालय परिसर आनंद आणि उत्साहाने फुलून गेला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुठेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ज्ञानदेव बेरड होते. यावेळी मुख्याध्यापक बन्सी नरवडे, पालक प्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक बन्सी नरवडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त व परिश्रम यांची जोड देण्याचा सल्ला दिला. शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक संधीचा लाभ घेत स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे शंकर मुठेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ या विषयावर उदाहरणांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करताना त्यांनी १८ वर्षांखालील मुलांनी मोटारसायकल चालवू नये, अन्यथा पालकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची माहिती दिली. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी शाळेच्या शैक्षणिक नियोजनाची माहिती देताना पहिल्याच दिवसापासून नियमित अध्यापन सुरू करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना वेळापत्रकांचे वितरण करण्यात आले असून मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती योजना आणि विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी सहशालेय व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आनंददायी शिक्षणाचा अनुभव घ्यावा, असेही ते म्हणाले.
यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प, पेन व गोड भोजन देण्यात आले. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करताना उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पांडुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष काकडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब कोतकर, सोपान तोडमल, धनंजय बारगळ, शिवाजी धस, आदिनाथ ठुबे, सौ. रूपाली शिंदे, सौ. संगीता मेढे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील गोविंद कदम, गोरक्ष कांडेकर, प्रा. एकनाथ होले, गणेश गायकवाड, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाड, सौ. वैष्णवी जगताप आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासह शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी वर्षात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी विद्यालय कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com