सामान्य कुटुंबातील मुलीची असामान्य कामगिरी; मुंबई पोलीस भरतीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या सुप्रिया शिंदेचा ठाकरे शिवसेनेकडून सन्मान






नगर : दर्शक । 

केडगाव येथील सुप्रिया शिंदे यांनी मुंबई पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत अथक परिश्रम, जिद्द. चिकाटी आणि सातत्याच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे. संपादन केलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहिल्यानगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महानगर प्रमुख किरण काळे यांच्या हस्ते सुप्रिया शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 



सुप्रिया हिच्या या यशामुळे केडगावसह संपूर्ण अहिल्यानगरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यास शिवसेना कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक आघाडीचे अनिस चुडीवाला, कामगार सेनेचे जयराम आखाडे, माथाडी कामगार संघटक देवराम शिंदे, विजय गायकवाड, प्रशांत कदम, दिपक रोकडे, बाबासाहेब वैरागर, विनोद शिरसाठ, सचिन लोंढे, दिपक काकडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुप्रिया शिंदे यांच्या यशामागे त्यांचे वडील शांताराम शिंदे आणि आई यांचे मोठे योगदान असून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोलाची साथ दिली. सुप्रियांनी दाखविलेली चिकाटी ही आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी किरण काळे यांनी व्यक्त केली.

काळे म्हणाले की, यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. सुप्रिया शिंदे यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलींनाही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करता येतात हे दाखवून दिले आहे. त्यांचे यश हे अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. 

विलास उबाळे म्हणाले, सुप्रियाची यशोगाथा केडगाव परिसरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक युवतींना प्रेरित करतील. सामान्य कुटुंबातून येऊन देखील अथक परिश्रमातून असामान्य यश संपादन करते याचा वस्तूपाठ सुप्रियाने भावी पिढी समोर ठेवल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व उपस्थितांनी सुप्रिया शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.