व्हॉट्सप ग्रुपवर मेसेज टाकल्याने बांधकाम व्यावसायिकाला मारहाण
नगर-
शहरातील यांनी त्यांच्या प्रभागातील 'सिंधी कॉलनी प्रभाग क्रमांक पाच या व्हॉट्सप ग्रुपवर एक मेसेज टाकला होता. त्यात त्यांनी परिसरात एक पिसाळलेला कुत्रा फिरत असून सर्वांनी दक्षता घ्यावी, अशी विनंती केली होती.
तारकपूर भागातील सिंधी कॉलनीमध्ये एका व्हॉट्सप ग्रुपवर पिसाळलेल्या कुत्र्याबाबत सतर्कतेचा मेसेज टाकल्याच्या कारणावरून एका बांधकाम व्यावसायिकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना २० जून रोजी रात्री ११.१८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विकी अशोक कुकरेजा (वय ३३, रा. सिंधी कॉलनी, तारकपूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकरेजा या मेसेजचा राग धरून आरोपी जितू गंभीर, कुणाल गंभीर, सोनू गंभीर आणि चिंटू गंभीर यांनी कुकरेजा यांना गाठले.
आरोपींनी कुकरेजा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी हातातील कडे आणि कुकरी या हत्यारांनी कुकरेजा यांच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर सपासप वार केले.
या हल्ल्यात कुकरेजा गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार दीपक गांगर्डे करत आहेत.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com