संचालक मंडळ आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी; आठ दिवसांत निर्णय न झाल्यास मोर्चा, उपोषणाचा इशारा
नगर : दर्शक ।
छत्रपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या झोपडी कँटीन अहिल्यानगर शाखेतील ठेवीदारांनी सुमारे दोन कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. अपर पेलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांना तसे पत्र देण्यात आले असून कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी ठेवीदारांना दिले.
शिष्टमंडळामधे विष्णू भुतकर, भगवान डोळे, अर्बन बँक बचाव समितीचे भैरवनाथ वाकळे, तुषार सोनवणे, डॉ. पराग गांधी, श्रीनिवास इप्पलपेल्ली, हर्षदा कांबळे, रामराव शेरकर, रामप्रसाद देशमुख, रामदास शेरकर, भास्कर सोनवणे, नंदकुमार चिखले, अरूण बोज्जा, प्रसाद निंबाळकर आदींसह अनेक ठेवीदार सहभागी होते.
ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, मुदत पूर्ण होऊनही ठेवी आणि व्याज परत मिळाले नसल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
तक्रारीत म्हटले की, ठेवीदारांमध्ये शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असून त्यांनी आयुष्यभराची बचत संस्थेत ठेवली होती. मात्र, अनेक वर्षे पाठपुरावा करूनही पैसे परत न मिळाल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काहींच्या मुलामुलींचे विवाह, तर काहींच्या औषधोपचारांवरही परिणाम झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
ठेवीदारांनी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, व्यवस्थापक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर विश्वासघात, अपहार आणि महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. संबंधितांविरोधात कठोर फौजदारी कारवाई करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
तक्रार अर्जात पोलीस अधीक्षकांना आठ दिवसांत ठोस कारवाई करण्याची विनंती करण्यात आली असून, अन्यथा मोर्चा, उपोषण आणि इतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या तक्रारीवर अनेक ठेवीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com