आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनकडून गणेश तनपुरे यांना 'महा ॲक्युपंक्चर रत्न 2026' पुरस्कार
नगर : दर्शक ।
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AGMA) च्या वतीने ॲक्युपंक्चर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चरिस्ट तथा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे जिल्हा सचिव श्री गणेश निवृत्ती तनपुरे यांना प्रतिष्ठेचा 'महा ॲक्युपंक्चर रत्न 2026' पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 19 जुलै रोजी झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला.
ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीचा प्रसार, रुग्णसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत श्री गणेश तनपुरे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या मोठ्या संख्येने ॲक्युपंक्चर थेरपिस्ट, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते डॉ. सुयोग गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, ॲड. दत्तात्रय जाधवर आणि ॲड. नागेश सोनुने उपस्थित होते.
यावेळी मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉ. सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर, श्री प्रशांत सावंत, सौ. दिशा चव्हाण, श्री विजय नवल पाटील, श्री तुषार वाघूळदे, डॉ. राजेंद्र गोऱ्हे तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गणेश तनपुरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीद्वारे रुग्णांना प्रभावी सेवा देत आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि व्यावसायिक उत्कृष्टतेची पावती मानला जात आहे.
या मानाच्या पुरस्काराबद्दल वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक संस्था, सहकारी, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून श्री गणेश निवृत्ती तनपुरे यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com