ऊर्जा रंगभवन येथे २५ जुलै रोजी दोन प्रयोग; सत्ता, स्वार्थ आणि भ्रष्ट व्यवस्थेवर प्रभावी व्यंग
नगर : दर्शक ।
सध्याच्या लोकशाही व्यवस्थेतील सत्तासंघर्ष, स्वार्थी राजकारण, भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांच्या संघर्षावर उपरोधिक भाष्य करणारे गाजलेले व्यंगनाट्य ‘मंकी बात’ प्रथमच अहिल्यानगरकरांच्या भेटीला येत आहे. समाजातील वास्तवावर मार्मिक भाष्य करत प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायला भाग पाडणारे हे नाटक शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी ऊर्जा रंगभवन येथे रंगणार आहे. नाटकाचे दोन प्रयोग आयोजित करण्यात आले असून पहिला प्रयोग सायंकाळी ६ वाजता तर दुसरा रात्री ८.३० वाजता होणार आहे. सन्मानिकांसाठी ९३२५५६७१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शीर्षकाप्रमाणेच ‘मंकी बात’मध्ये जंगलातील माकडांच्या जीवनचक्राच्या माध्यमातून सत्तेचा खेळ आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे. ‘जंगलराज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यवस्थेत ‘बलवान तोच टिकतो’ या तत्त्वाचा समाजव्यवस्थेशी जोडलेला संदर्भ नाटकातून अत्यंत प्रभावी रूपकाच्या स्वरूपात मांडण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाहीतील अनेक विसंगती आणि सत्तेचे वास्तव प्रेक्षकांसमोर जिवंतपणे उभे राहते.
भ्रष्ट व्यवस्था, सत्तेचा गैरवापर आणि त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम यांचे मार्मिक चित्रण या नाटकात करण्यात आले आहे. उपरोधिक संवाद, प्रभावी अभिनय, प्रतीकात्मक मांडणी आणि आशयघन सादरीकरणामुळे हे नाटक प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन करत नाही, तर त्यांना आत्मपरीक्षण आणि सामाजिक वास्तवाचा विचार करण्यासही प्रवृत्त करते.
या नाटकाची निर्मिती अध्ययन भारतीच्या ‘ॲग्रो थिएटर’, वर्धा यांनी केली असून दिग्दर्शन हरीष इथापे यांचे आहे. संवादलेखन शाम पेठकर आणि हरीष इथापे यांनी केले आहे. नेपथ्य किमया पोहाणे, संगीत जैद हसन, गीतरचना प्रतीक बुडूकले, प्रकाशयोजना सुहास नगराळे आणि वेशभूषा मिनल इथापे यांनी सांभाळली आहे.
नाटकात आकाश पांडे, शरीफ पठाण, आविष्कार ठाकूर, हर्षवर्धन मानेकरी, दीक्षा उजागरे, रसिका मुळे, हास्या हलुले, तेजस ढोबळे, किमया गिरी, प्रगती बांगडकर, संहिता इथापे, चिंदबरम अक्कल आणि प्रतीक बुडूकले यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयातून व्यंग, विनोद आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
अहिल्यानगरातील या प्रयोगासाठी ऊर्जा रंगभवन, सतीश लोटके, पी. डी. कुलकर्णी, श्याम शिंदे, पवन श्रीकांत नाईक आणि ज्ञानेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सामाजिक जाणिवा जागृत करणाऱ्या या आशयघन व्यंगनाट्याला अहिल्यानगरातील रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com