पोशम्मा तल्ली व लचमम्मा तल्ली देवींच्या चरणी आरोग्य, समृद्धी व सुख-शांतीसाठी साकडे
नगर : दर्शक ।
पद्मशाली समाजाचा पारंपरिक बागुलू पंडुगू (बागेचा सण) श्रमिकनगर, सावेडी येथे शुक्रवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. श्रमिकनगर येथील शितळादेवी (पोशम्मा तल्ली) आणि लक्ष्मीमाता (लचमम्मा तल्ली) या दोन्ही मंदिरांमध्ये पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी, पूजा-अर्चेसाठी व पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यासाठी पद्मशाली समाजातील महिला भगिनींसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या पारंपरिक यात्रा उत्सवाचे आयोजन श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यात्रेचे नियोजन व व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळल्यामुळे संपूर्ण धार्मिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यात्रा उत्सवानिमित्त पोतराजांच्या उपस्थितीत महिलांनी डोक्यावर आकर्षक सजविलेले बोणालू (कलश) घेऊन ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात परिसरातून भव्य मिरवणूक काढली. अनेक महिला भगिनींनी आपल्या नवसपूर्तीसाठी डोक्यावर बोणालू वाहून यात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण परिसर जयघोषाने आणि भक्तिरसाने दुमदुमून गेला होता.
या यात्रेत श्रमिकनगर, सावेडी परिसरातील पद्मशाली समाजाबरोबरच सर्व समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.
बागुलू पंडुगू हा पद्मशाली समाजाचा पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा सण असून तो दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. या दिवशी पोशम्मा तल्ली आणि लचमम्मा तल्ली देवीची विधिवत पूजा करून समाजातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, रोगराईपासून संरक्षण मिळावे, संतुलित पर्जन्यवृष्टी व्हावी, शेती समृद्ध राहावी तसेच समाजात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते. देवीला गोड पुरी, मेथीची भाजी, दही, हळद टाकलेला भात, नारळ, फुटाणे, लिंबाची पाने, ओवा आणि थंड पाणी असा पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.
दिवसभर दोन्ही मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला भगिनींनी भक्तिभावाने देवीची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा बागुलू पंडुगू उत्सव यंदाही श्रमिकनगर परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com