‘भारतरत्न लता मंगेशकर – संगीताची सरस्वती’ या व्याख्यानासह तेलुगू सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०८ कलाकारांच्या सहभागाने रंगला सांस्कृतिक सोहळा
नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ ।
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतरत्न लता मंगेशकर – संगीताची सरस्वती’ या विशेष व्याख्यानासह भव्य तेलुगू सांस्कृतिक कार्यक्रमाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साहित्य, संगीत आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमात भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीत वारशाचा जागर करण्यात आला. व्याख्यानातून त्यांच्या जीवनातील अनेक अपरिचित पैलू उलगडले गेले, तर विविध पारंपरिक नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांना भारतीय पारंपारिक शास्त्रीय संस्कृतीचे वैभव अनुभवण्याची संधी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तेलुगू साहित्य अकादमीचे समन्वयक अशोक कंटे, स्थानिक समन्वयिका सुरेखा कोडम व श्री भिमराज कोडम, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी हरीश इरनक तसेच ‘भारतरत्न लता मंगेशकर – संगीताची सरस्वती’ या पुस्तकाचे लेखक आणि प्रमुख व्याख्याते कस्तुरी मुरलीकृष्णा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक वातावरणात झाली.
प्रमुख व्याख्याते कस्तुरी मुरलीकृष्णा यांनी आपल्या प्रभावी भाषणात लता मंगेशकर यांच्या जीवनप्रवासाचा अत्यंत हृदयस्पर्शी आढावा घेतला. ते म्हणाले, "लतादीदी या साक्षात सरस्वतीचा अवतार होत्या. त्यांनी भारतातील जवळपास प्रत्येक राज्यातील भाषांमध्ये आपल्या सुमधुर आवाजातून गीते सादर करून भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या स्वरांनी लाखो-कोट्यवधी भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कर्तृत्वाची उंची इतकी महान आहे की, लतादीदींसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे अशक्य आहे."
यावेळी त्यांनी आपल्या ‘भारतरत्न लता मंगेशकर – संगीताची सरस्वती’ या पुस्तकातील अनेक संदर्भ उपस्थितांसमोर मांडले. लता मंगेशकर यांच्या बालपणापासून ते जागतिक कीर्तीच्या गायिका होण्यापर्यंतचा संघर्ष, त्यांची साधी राहणी, संगीतावरील निष्ठा, विविध भाषांमधील गायन, संगीतकार आणि गीतकारांशी असलेले संबंध, तसेच त्यांचा गाण्यातील ठहराव , त्यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात प्रसंग त्यांनी रसाळ शैलीत उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या तेलुगू विवेचनामुळे श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. व्याख्यान संपल्यानंतरही उपस्थितांनी त्यांना अनेक प्रश्न विचारत संवाद साधला.
कार्यक्रमाचे समन्वयक अशोक कंटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या माध्यमातून तेलुगू भाषांतील साहित्य, संगीत आणि संस्कृती यांचा परिचय समाजाला करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. अहिल्यानगरात झालेल्या या कार्यक्रमात तब्बल १०८ कलाकारांनी सहभाग नोंदविला. हिंदू संस्कृतीत १०८ या अंकाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. योगायोगाने १०८ कलाकारांनी सहभाग घेतल्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आगळावेगळा सांस्कृतिक विक्रम ठरला आहे. विविध परंपरांचा संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद भविष्यात अशाच मोठ्या उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. अंजली नृत्यालयाच्या कलाकारांनी ‘स्वागतकृष्णा’, ‘चंद्रचूड’, ‘प्रणवालय’ आणि ‘तांडव’ ही भरतनाट्यम नृत्ये सादर करून भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचे अप्रतिम दर्शन घडविले. या सर्व नृत्यांची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन कु. प्रतिमा कोडम आणि कु. वैभवी म्याना यांनी केले होते. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
त्यानंतर श्री गुरुदत्त महिला मंडळाने पारंपरिक ‘मंगळागौर’ सादर करून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडविले. एकदंत महिला मंडळाने तेलंगणातील प्रसिद्ध ‘बतकम्मा’ हा सांस्कृतिक सोहळा सादर केला. फुलांच्या सजावटीसह “बतकम्मा” तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांची विशेष मने जिंकली. तसेच नित्य सेवा महिला मंडळ आणि मार्कंडेय ग्रुप यांनी संयुक्तपणे पारंपरिक ‘कोलालु’ सादर करून तेलुगू संस्कृतीचे वैशिष्ट्य प्रभावीपणे मांडले. विविध रंगांची वेशभूषा, संगीत आणि पारंपरिक सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह सांस्कृतिक उत्साहाने भारावून गेले.
या कार्यक्रमाला साहित्य, संगीत, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांसह तेलुगू समाजबांधव, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महिला मंडळांच्या सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक समन्वयिका सुरेखा कोडम, भीमराज कोडम, ज्ञानेश्वर मंगलारम, अजय म्याना, दीपक गुंडू, श्रीनिवास एल्लारम, संजय चिप्पा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेलगु मधून श्री अशोक कंटे व मराठी मधून श्रीनिवास एल्लारम यांनी प्रभावीपणे केले, तर भीमराज कोडम यांनी आभार मानले.
संगीताची आराधना, साहित्याचा गौरव आणि भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम नगरच्या सांस्कृतिक इतिहासात संस्मरणीय ठरला. लता मंगेशकर यांच्या स्वरांचा वारसा, भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि विविध भाषांतील सांस्कृतिक ऐक्य यांचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com