Ahmednagar College |  संशोधनाला चालना; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व अत्याधुनिक प्रयोगशाळा उपकरणांचे वितरण







 Ahmednagar College |  नगर : दर्शक । बी.पी.एच.ई. सोसायटीच्या अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभाग, जॉन बार्नाबस पदव्युत्तर जैवशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आयुर्वेद, आरोग्य विज्ञान व क्लिनिकल चाचण्या या विषयांवर व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक संदर्भ, क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन, संशोधनाची शास्त्रीय पद्धत आणि संशोधन प्रकाशनाच्या विविध टप्प्यांबाबत प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन मिळाले.



        या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. श्री. विशाल बार्नाबास यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. डॉ. भालसिंग, प्रा. डॉ. नाबदे व प्रा. डॉ. बेदरकर, विना-अनुदान विभाग समन्वयक डॉ. रझाक, महाविद्यालयाच्या निबंधक श्रीमती भिंगारदिवे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रसाद लामरुड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत कटके यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. वंजारे यांनी केले.



        उद्घाटन समारंभात अहमदनगर महाविद्यालयाच्या जैवविज्ञान विभागाचे मानद सल्लागार तथा SERIA संस्थेचे विश्वस्त डॉ. मनोहर फुर्ताडो, तसेच SERIA संस्थेचे विश्वस्त डॉ. सदाशिव लोणकर आणि डॉ. प्रियांका थोलार यांच्या हस्ते संशोधन क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये २५ हजार शिष्यवृत्ती आणि प्रयोगशाळेतील उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अनुजा भालेराव, रिझवान खान, गोविंद सी. निकम (प्राणीशास्त्र विभाग), सदाफ सय्यद (वनस्पतिशास्त्र विभाग) आणि लिकू डेव्हासे (रसायनशास्त्र विभाग) यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे संशोधन क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच प्रयोगशाळा पातळीवर आवश्यक असलेले पाठबळ मिळाले.



         तसेच वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अविनाश वंजारे, डॉ. प्रशांत कटके, डॉ. राजेश टाक आणि डॉ. सनी रुपवते यांचा विशेष गौरव करण्यात आला. डॉ. वंजारे व डॉ. कटके यांनी ब्रेकिओपॉड्स विषयक संशोधनात महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रकाशित करून संशोधन अनुदान प्राप्त केले आहे. डॉ. राजेश टाक आणि डॉ. सनी रुपवते यांनी जॉन बार्नाबस पदव्युत्तर जैवशास्त्र विभागातील केंद्रीय उपकरण सुविधा केंद्रासाठी अत्याधुनिक GCMS उपकरण खरेदीसाठी क्रोमॅटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया कडून रु. १५ लाखांचे अनुदान मिळविले. या कामगिरीमुळे महाविद्यालयातील वैज्ञानिक संशोधनाला मिळणारी चालना आणि अत्याधुनिक संशोधन सुविधांच्या निर्मितीला मिळालेले बळ अधोरेखित झाले.




          कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ. गिरीश टिल्लू, प्रमुख अन्वेषक, आयुष उत्कृष्टता केंद्र, आरोग्य विज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी "अश्वगंधा स्टोरी ट्रेडिशनल नॉलेज इन मॉडर्न कॉन्टेक्स्ट" या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये अश्वगंधा या महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक वनस्पतीशी संबंधित पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक आरोग्य विज्ञान आणि संशोधनाच्या संदर्भात विचार करण्यात आला. या व्याख्यानास अहिल्यानगर तसेच बाहेरील महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



        दुसऱ्या सत्रात "Clinical Trials - Planning to Publication (क्लिनिकल चाचण्या नियोजनापासून संशोधन प्रकाशनापर्यंत)" या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन, संशोधन आराखडा, अंमलबजावणी, माहितीचे विश्लेषण, अहवाल लेखन तसेच संशोधन लेखांचे चिकित्सक मूल्यमापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेपूर्वी व कार्यशाळेनंतर ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना व संशोधकांना क्लिनिकल संशोधनाच्या संपूर्ण प्रक्रियेची शास्त्रीय पद्धतीने माहिती घेता आली.



             ही कार्यशाळा विज्ञान, जीवशास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, फार्मसी, आरोग्य विज्ञान तसेच संबंधित शाखांतील प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक आणि विशेषतः पीएच.डी. संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सहभागींच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले. या उपक्रमामुळे विविध विज्ञान शाखांमध्ये संशोधनाची दिशा, संशोधनातील शास्त्रीय दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत विद्यार्थ्यांना व संशोधकांना नवी दृष्टी मिळाली.