Padmashali Samaj Nagar | पद्मशाली महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा संकल्प
नगर : दर्शक । पद्मशाली समाजातील महिलांना शासकीय योजनांची माहिती, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन झालेल्या पद्मशाली महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या पदग्रहण व नोंदणी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दिल्लीगेट येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ महिला, माजी नगरसेविका आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली समाजाच्या प्रथम महिला नगरसेविका तथा ९४ वर्षीय ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सखुबाई संदुपटला या होत्या. प्रारंभी समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीबाई गुंडू, सौ. राधाबाई गुरुड, शशिकला मुदीगंटी, सौ. विनाताई बोज्जा, सौ. अर्चनाताई बिज्या आदी मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. स्वाती शिरसुल आपल्या भाषणात म्हणाल्या की, "पद्मशाली समाजातील अनेक महिला पूर्वी विडी व्यवसायावर अवलंबून होत्या. हा व्यवसाय जवळपास बंद पडल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा महिलांना शासनाच्या विविध योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी संस्था सातत्याने कार्य करणार आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "समाजातील महिलांमध्ये संघटन, नेतृत्व आणि आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच तेलुगू भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे जतन करण्यासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येतील. प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था पुढाकार घेईल. विशेषतः घर नसलेल्या गरजू कुटुंबांसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल."
यावेळी काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा तथा पद्मशाली समाज महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ. शामला बोरा यांनी महिलांना संघटित होण्याचे आवाहन केले. माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीबाई गुंडू यांनी समाजातील विवाह विषयक समस्या मांडत युवक-युवतींच्या अपेक्षा कमी करून योग्य वयात विवाह होण्यासाठी संस्थेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. गीताताई गिल्डा यांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उत्तर देताना त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी संस्थेला आणि समाजाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती सखुबाई संदुपटला यांनी पद्मशाली समाज हा कष्टाळू, प्रामाणिक आणि शांतताप्रिय असल्याचे सांगत नव्या पिढीने शिक्षण, उद्योग आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाचे नाव अधिक उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. तसेच महिलांनी सामाजिक नेतृत्व स्वीकारून समाजाच्या प्रगतीत सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. सौ. स्वाती शिरसुल यांची अध्यक्षा, ज्योती बिज्या व सौ. सारिका म्याना यांची उपाध्यक्षा, सौ. रेणुका गाली यांची सचिव, तर सौ. पदमा म्याना यांची खजिनदार म्हणून निवड झाली. सदस्यपदी अन्य १५ महिलांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.ए. सौ. सुनंदाताई रच्चा यांनी केले, तर सौ. रेणुका गाली यांनी आभार मानले. यावेळी रंजना क्यादर, लता पुलगम, शारदा सुंकी, नीता मंचे, रुक्मिणी संदुपटला, सावित्रीबाई गोने, अरुणा जंगम, अंबिका आडेप, ललिता दुडम, सोनी सब्बन, रूपाली शिरसुल यांच्यासह समाजातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com