मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाचा सर्व पक्षांना फायदा- केंद्रीय मंत्री रामदास आठवले 

मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाचा सर्व पक्षांना फायदा- केंद्रीय मंत्री रामदास आठवले


                 


नगर : दर्शक । 

अबकड आरक्षण उपवर्गीकरणा मुळे मातंग व बौद्ध समाजात सध्या तेढ निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. पण बौद्ध समाजात शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला. त्यामुळे मातंग समाजानेही शिक्षणाची कास धरावी तसेच सरकारनेही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा करावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले .



          आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन करण्यासाठी मंत्री आठवले नगरला आले होते. त्यावेळी विश्रामगृहावर  पत्रकारांशी ते बोलत होते. रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह हेमंत रणपिसे, राजाभाऊ साळवे, श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, अजय साळवे, किरण दाभाडे, भीमराव बागुल उपस्थित होते.



        बौद्ध समाजाला शिक्षणाचे प्रमाणात आरक्षणाचा फायदा होतो. मातंग व अन्य समाजात शिक्षण कमी असल्याने त्यांना आरक्षण मिळत नाही हे जरी खरे असले तरी उद्या आरक्षण उपवर्गीकरण करून त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा ठेवल्या, पण त्या जागांसाठी आवश्यक पात्रतेचे उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा रिक्त राहतील. असे होऊ नये म्हणून मातंग समाजानेही शिक्षण प्रवाहात आले पाहिजे व सरकारनेही मातंग समाजाच्या विकासाचा आराखडा राबवला पाहिजे, असे मंत्री आठवले म्हणाले. 




         महिला आरक्षण व मतदार संघ पुर्नरचना विधेयक संसदेत आणले पाहिजे, त्याचा सर्व पक्षांना फायदा होणार असल्याने त्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असे स्पष्ट करून आठवले म्हणाले, सध्याचे मतदारसंघ आरक्षण २०३४ पर्यंत असले तरी २०२९ पासून लागू होणाऱ्या पुर्नरचनेमध्येही आरक्षण राहणार आहे. प्रत्येक राज्यातील एक तृतीयांश जागा वाढणार आहेत. उत्तर व दक्षिण असा कुठलाही भेदभाव होणार नाही, असा दावा करून आठवले यांनी सर्व राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.




             ज्येष्ठ नेते शरद पवार २०१९ मध्ये एनडीएमध्ये आले असते तर २०२२ मध्ये ते राष्ट्रपती झाले असते, असा गौप्यस्फोट आठवले यांनी केला. शरद पवार हे एनडीएमध्ये येणार की नाही, हे माहिती नाही असे मंत्री आठवले यांनी यावेळी सांगितले.