जनतेचे प्रश्न सोडवून भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढवा; वैशाली चव्हाण यांचे आवाहन



नगर | महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला तसेच समाजातील तळागाळातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे काम महिला कार्यकर्त्यांनी हाती घ्यावे. त्याचबरोबर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने जनसंपर्क ठेवावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा अहिल्यानगर जिल्हा प्रभारी सौ. वैशाली चव्हाण यांनी केले.




           भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्यानगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सौ. प्रिया जानवे होत्या. यावेळी सावेडी मंडल, केडगाव मंडल सरचिटणीस कल्याणी ठुबे भिंगार मंडल अध्यक्षा सौ ज्योत्स्ना मुंगी तसेच मध्य मंडल अध्यक्षा सो सुरेखा जंगम या चारही मंडलांचे संघटनात्मक बैठक घेण्यात आली.व पदाधिकाऱ्यांकडून कामाची माहिती जाणून घेण्यात आली.




           यावेळी मार्गदर्शन करताना सौ. वैशाली चव्हाण म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने समाजातील विविध घटकांसाठी अनेक कल्याण कारी योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी प्रवासात सवलत, उज्ज्वला योजना, लेक लाडकी योजना, मुद्रांक शुल्कात सवलत, महिला सन्मान योजना, उमेद अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना तसेच महिला शेतकरी सक्षमीकरण अशा विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी प्रत्येक महिला कार्यकर्त्याने स्वीकारावी.




        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. मात्र, केवळ वरिष्ठ नेत्यांच्या नावावर पक्षाचे काम चालेल, या भ्रमात कोणीही राहू नये. ‘प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि नंतर आपण’ या ब्रीदवाक्याने प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळातील जनतेसाठी काम केले पाहिजे. पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा नियमित आढावा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्याकडे पाठवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.




         सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव, विविध समाजांचे उत्सव, चौकाचौकातील मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, लग्नसमारंभ, व्याख्याने आणि विविध संमेलने अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन सामान्य नागरिकांशी संवाद साधावा. त्यांच्या अडचणी आणि प्रश्न जाणून घेऊन पक्षाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. सतत जनतेच्या संपर्कात राहिल्यानेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.




        प्रारंभी सौ. स्वाती सिरसुल यांनी जिल्हा प्रभारी सौ. वैशाली चव्हाण यांचा परिचय करून दिला. श्रीरामपूर येथील सामान्य कुटुंबातून आलेल्या वैशाली चव्हाण यांनी गेल्या १५ ते २० वर्षांपासून भारतीय जनता पार्टीसाठी तन-मन-धनाने काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांना श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून नगरसेविकेची संधी मिळाली. त्या सलग तीन वेळा या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.      



 पक्षनिष्ठा, कामाचा दांडगा अनुभव आणि सामान्य जनतेशी असलेली नाळ लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिवपदी तसेच अहिल्यानगर जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली असल्याचे स्वाती सिरसुल यांनी सांगितले.




        यावेळी जिल्हाध्यक्ष सौ. प्रिया जानवे, उपाध्यक्ष सौ. स्वाती पवळे, उपाध्यक्षा सौ. नीता गायकवाड, सरचिटणीस सौ. ज्योती दांडगे , सौ संध्या पावसे , सौ सुजाता औटी , प्रज्ञा जोशी , प्रतीक्षा रसाळ , पल्लवी जाधव , रेखा मैड , उज्वला भांगे , पूजा आहेर नीता गायकवाड , सुनंदा गंजी , राखी आहेर , इ.महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



        बैठकीनंतर भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती सिरसुल यांच्या जनसंपर्क कार्यालयास सौ. वैशाली चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘भारत माता की जय’, ‘नरेंद्र मोदी की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.राजकीय क्षेत्रात महिलांना योग्य संधी मिळावी यासाठी भाजपच्या वतीने महिला प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  




महिलांसाठी प्रस्तावित आरक्षणाच्या प्रक्रियेत विरोधकांकडून अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, अशा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी घरी न बसता सातत्याने जनतेत जाऊन संपर्क वाढवावा आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करावी, असे आवाहन सौ. वैशाली चव्हाण यांनी शेवटी केले.