Nepti | नेप्ती विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप ; माजी विद्यार्थी मनोज पवार यांचा पुढाकार
Nepti | नगर : दर्शक । नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री स्वामी आण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती विद्यालयात माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज चिंतामण पवार यांनी पुढाकार घेतला. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर यांसह विविध शैक्षणिक साहित्य तसेच शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
स्वतः ज्या विद्यालयात शिक्षण घेतले, त्याच विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न मनोज पवार यांनी केला. शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणातील आवश्यक साहित्यापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
यावेळी संस्था संचालक दिलीप होळकर, केडगावचे केंद्रप्रमुख भगवान बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार, रामदास फुले, अमोल चौगुले, महेश पवार, पोलीस पाटील अरुण होले, गोरख जपकर, अजित कोतकर, नानासाहेब होळकर, मुख्याध्यापक बाबा भोर, नानासाहेब घोडके, संतोष खरमाळे, गोरक्ष कोतकर, बाबूलाल सय्यद ,सविता कोरडे, श्रद्धा भांड, अश्विनी पवार, शिवाजी जाधव यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आर्थिक परिस्थिती ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोर अडथळा ठरू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास सोडू नये. आजच्या स्पर्धेच्या युगात ज्ञान, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर आपले भविष्य घडविता येते. आपण ज्या विद्यालयातून घडलो, त्या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता येणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.
विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून मन लावून अभ्यास करावा. आई-वडिलांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि समाजाकडून मिळणारा आधार यांचे भान ठेवून आपल्या आयुष्यात मोठे ध्येय निश्चित करावे. प्रत्येक सक्षम व्यक्तीने आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढे येणे आवश्यक आहे. परिस्थिती अडचणीची असली तरी शिक्षण थांबू नका असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार यांनी केले.
पवार पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे; मात्र अनेकदा आर्थिक परिस्थिती त्यांच्या स्वप्नांच्या आड येते. अशा विद्यार्थ्यांना वेळेवर आधार मिळाल्यास ते निश्चितच मोठे यश मिळवू शकतात.
शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी स्वागत करून मनोज पवार यांचे आभार मानले. कार्यक्रमातून ‘गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणजे त्यांच्या भविष्यातील संधींना बळ’ हा सकारात्मक संदेश देण्यात आला .या कार्यक्रमासाठी निखिल कडलग ,शुभम कोतकर,किरण सोनवणे या मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com