Ahmednagar College | अहमदनगर कॉलेजमध्ये २२ सप्टेंबरला ‘TECHNO MUTATION 2026’ संगणक प्रदर्शन
Ahmednagar College | नगर : दर्शक । बी.पी.एच.ई. सोसायटीच्या अहमदनगर कॉलेजमधील संगणक शास्त्र विभागातर्फे २२ सप्टेंबर २०२६ रोजी ‘TECHNO MUTATION 2026’ या भव्य संगणक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजच्या संगणक शास्त्र विभागाच्या प्रांगणात सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे.
अहमदनगर कॉलेजमध्ये संगणक प्रदर्शनाची सुरुवात १९९४ पासून झाली असून, विद्यार्थ्यांमध्ये संगणक व तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांच्या तांत्रिक आणि सर्जनशील कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाची परंपरा आजही विविध स्वरूपात पुढे सुरू आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अहिल्यानगर शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांमध्ये संगणकाविषयी असलेली जागरूकता जाणून घेण्यासाठी प्रश्नावली सोडवून घेण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संगणकविषयक ज्ञान, तंत्रज्ञानातील आवड तसेच बदलत्या संगणकीय क्षेत्राविषयीची माहिती जाणून घेण्यात आली.
या प्रदर्शनात अहिल्यानगर शहर तसेच विविध महाविद्यालयांमधील आणि विविध शाखांमधील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान क्षमता, इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स, रोबोटिक्स तसेच अद्ययावत संगणकीय प्रणालींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व सादरीकरण हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञ परीक्षकांद्वारे उत्कृष्ट प्रोजेक्ट्सची निवड करण्यात येईल. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजित कुलकर्णी, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. सय्यद रजाक आणि प्राध्यापकवृंद यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अहिल्यानगर शहरातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच तंत्रज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com