Hindi Divas Nagar | श्री समर्थ प्रशालेत हिंदी दिवस उत्साहात साजरा






Hindi Divas Nagar | नगर : दर्शक । श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत असलेल्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला, सावेडी येथे हिंदी राष्ट्रभाषा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.




कार्यक्रमाची सुरुवात श्री समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन, ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ. वसुधा जोशी यांनी प्रास्ताविकात हिंदी दिवसाचे महत्त्व विशद केले. हिंदी दिवस दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 



हिंदी ही देशाला एकत्र बांधणारी, संवाद सुलभ करणारी आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करणारी भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हिंदी साहित्य समृद्ध करण्यामध्ये अनेक कवी व साहित्यिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.




       यानंतर प्रमुख अतिथी सौ. श्रुती कुलकर्णी यांचा परिचय करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी नाटिका सादर केली. तसेच हार्मोनियम व तबल्याच्या साथीने देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध सांस्कृतिक सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेप्रती असलेला आदर आणि अभिमान व्यक्त केला.



         प्रमुख अतिथी सौ. श्रुती श्रीपाद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषेचे राष्ट्रीय एकात्मतेतील स्थान स्पष्ट केले. हिंदी ही जनमानसाची, देशाची आणि एकतेची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच संत कबीर, गोस्वामी तुलसीदास, हरिवंशराय बच्चन यांसारख्या साहित्यिकांनी हिंदी साहित्य समृद्ध केले असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी हिंदीचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘कदम मिलाकर’ ही कविता वाचण्यास प्रोत्साहित केले.




        या कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ. वसुधा जोशी व पर्यवेक्षिका सौ. शारदा होशिंग यांचे मार्गदर्शन लाभले. हिंदी विभाग प्रमुख श्रीमती नारळे, सहाय्यक शिक्षिका सौ. योगिता कुलकर्णी व सौ. वैष्णवी साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अमोल बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले, तर कु. स्वाती घुले यांनी आकर्षक फलकलेखन व कार्यक्रमपत्रिका तयार केली.



        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कादंबरी दीपक बनकर हिने केले, तर कु. संस्कृती शिंदे हिने आभार प्रदर्शन केले. हिंदी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.