पैगंबर जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले उर्दू शाळेत वक्तृत्व व नाअत स्पर्धा उत्साहात




 

नगर : दर्शक ।  पैगंबर हजरत मोहम्मद(स.) यांनी संपूर्ण मानवजातीला प्रेम, शांतता, दया, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी नेहमी सत्याची साथ देण्याची आणि गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची शिकवण दिली. त्यांचे संपूर्ण जीवन हे मानवतेसाठी प्रेरणादायी आहे.





आजच्या काळात त्यांच्या विचारांची गरज अधिक आहे. समाजात जात, धर्म किंवा भाषा यापेक्षा माणुसकीला महत्त्व देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आत्मसात करून समाजासाठी उपयोगी नागरिक बनावे, हीच पैगंबरांच्या शिकवणीला खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.




मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत पैगंबर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व नाअत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनींनी पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे प्रेम, दया, बंधुभाव, मानवता, सत्य, प्रामाणिकपणा व सामाजिक सलोख्याचे विचार प्रभावीपणे मांडले. नाअत स्पर्धेतही विद्यार्थिनींनी सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.




स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थिनींना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.




यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, हसीब शेख, मुख्याध्यापक सय्यद नौशाद अहमद, शेख फरजाना दिलावर, शेख असलम युसुफ पटेल, शेख शाहीन मोहम्मद इसाक, शेख हिना अब्दुल कुद्दुस, शेख सुलताना अब्दुल लतीफ, फरहा बाजी, अमरीन बाजी आदी उपस्थित होते.




कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये पैगंबरांच्या जीवनातील मानवतावादी मूल्यांची जाणीव निर्माण करण्याबरोबरच वक्तृत्व व कलागुणांना व्यासपीठ मिळाले.